पुणे : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केले. त्यानंतर त्यांनी शिवसेना-भाजप सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अलीकडेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत एनडीएच्या बैठकीत भाग घेतला. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार विरोधकांची मोर्चेबांधणी करत आहेत. याबाबत अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवारांनी 5 तारखेला आपल्या नव्या भूमिकेबाबत सांगितले आहे. एनडीएच्या माध्यमातून राज्यात आणि देशात काम करण्याचा आमचा मानस असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्रीपदाचा मुद्दा संपला : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन पुण्यात करण्यात आले होते. बक्षीस वितरण कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित होते. अजित पवार यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेबाबत सुनील तटकरे म्हणाले की, आम्ही राज्य सरकारमध्ये सहभागी झालो तेव्हाच मुख्यमंत्रिपद स्पष्टता झाली आहे. आम्ही एनडीएचा घटक पक्ष आहोत. अजित पवारांना मुख्यमंत्रीपद मिळावे, अशी राज्यातील अनेक कार्यकर्त्यांची इच्छा, अपेक्षा आहे. पण आता आमची महाआघाडी झाली आहे, त्यामुळे आता मुख्यमंत्रीपदाचा मुद्दा राहिलेला नाही असे तटकरे म्हणाले.