पुणे - महाविकास आघाडीच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये चांगले संबंध आहेत. मात्र, खेडमधील पंचायत समितीच्या सभापती पदासाठी आमदार दिलीप मोहिते यांच्याकडून घाणेरडे राजकारण सुरू आहे, असा आरोप संजय राऊतांनी केला आहे. तसेच आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सल्ल्यानुसार खेडमध्ये आलो आहोत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या आमदाराला वेसण घाला, असा सल्ला त्यांनी दिला आहे. खेड येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
हेही वाचा -जालन्यातील 'त्या' मांत्रिकाला अटक; पैशाचा पाऊस पाडण्यासाठी कुटुंबातील सदस्याचा बळी मागितला होता
खेड पंचायत समितीचा वाद वरिष्ठांपर्यंत
खेड पंचायत समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीचा वाद अखेर आता वरिष्ठांपर्यंत पोहोचला आहे. शिवसेनेचे विद्यमान आमदार सभापती भगवान पोखरकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते यांच्या गटातील वाद आता वरिष्ठांपर्यंत पोहोचला आहे. या प्रकरणाची दखल घेऊन शिवसेनेचे खासदार संजय राऊत आज खेडमध्ये दाखल झाले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते यांच्यावर निशाणा साधला आहे. यावेळी बोलताना राऊत म्हणाले, लोकं फोडून सत्ता स्थापन करायची हे खेडमध्ये घडले. पंचायत समितीच्या जागेबाबत हा वाद आहे. राष्ट्रवादीचे आमदार घाणेरडे राजकारण करत आहेत. खेडचे विद्यमान आमदार हे शरद पवारांच्या पक्षात राजकारण करण्यासाठी लायक नाहीत, पंचायत समितीच्या जागेवरून आमदार राजकारण करत आहे ते परंपरेला धरून नाही, अजितदादांना सांगूनसुद्धा हे रेटून नेत असतील तर याला काय म्हणायच? पंचायत समितीच्या सदस्यांना पैशांच्या आमिषाने पळवून नेलं. हा विषय लवकरच आम्ही त्यांच्या प्रमुखांना कळवू, असा इशारा देखील संजय राऊत यांनी दिला आहे.