पुणे -राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले ते भयानक आहे. केंद्राची मदत जाहीर होईल. तोपर्यंत ओला दुष्काळ तरी जाहीर करा, असे आवाहन खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी राज्य सरकारला केले आहे.
या आपत्तीबाबत राजकारण न करता शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज आहे, असे मत खासदार संभाजीराजे यांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले. 'राज्य सरकारने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पाहता राज्य सरकारने तातडीने निधी दिला पाहिजे. जोपर्यंत ओला दुष्काळ जाहीर होत नाही, तोपर्यंत केंद्रीय पथक पाहणी करण्यास येणार नाही. आज जर तातडीने शेतकऱ्यांना मदत दिली नाही तर, पुढील रब्बीचे पीक शेतकरी कसे घेणार, असे संभाजीराजे यांनी म्हटले आहे. याकरता ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली. तसेच, विमा कंपन्या जाचक अटी घालून शेतकऱ्यांना वेठीस धरतात. अशा कंपन्यावर कारवाई केली पाहिजे.
राज्यात अतिपावसामुळे शेतकऱ्यांची महाभयानक परिस्थिती आहे. या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी पूरग्रस्त भागाचा दौरा केला,' असे ते म्हणाले.
हेही वाचा -देशाच्या विकासामध्ये पोलिसांचे योगदान मोठे - पी. शिवशंकर