पुणे:गेल्या काही दिवसांपासून पुण्याचे खासदार गिरीश बापट हे आजारी असून राज्यातील सर्वच नेते मंडळी यांनी त्यांची भेट घेतली आहे. कसबा पोट निवडणुकीत बापट आजारी असताना देखील त्यांनी पक्षासाठी प्रचार केला. आज सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास बापट यांनी पुण्यातील अहिल्यादेवी हायस्कूल येथे येऊन आपला मतदानाचा हक्क बजावला.
बजावला मतदानाचा हक्क:कसबा पोटनिवडणुकीच्या मतदानाला शेवटची काही मिनिटे बाकी असताना अखेर गिरीश बापट यांनी मतदानासाठी हजेरी लावली. कसबा मतदार संघातील अहिल्यादेवी हायस्कूल गर्ल्स शनिवार पेठ येथे संध्याकाळी 5 वाजता मतदानासाठी खासदार गिरीश बापट उपस्थित राहिले. खासदार गिरीश बापट हे आजाराशी झुंज देत असताना देखील मतदान करण्यासाठी बाहेर आले. त्यामुळे त्यांनी सर्वांचेच लक्ष वेधले होते. गेले 25 वर्ष ते याच प्रभागातून आमदार होते व आता खासदार देखील आहेत. त्यामुळे त्यांचे मत हे महत्वाचे मानले जात आहे.
प्रचारात देखील राहिले होते उपस्थित: गिरीश बापट हे प्रचारात देखील एक दिवस हजर होते. आजारी असताना देखील बापट प्रचारात सहभागी झाल्यानंतर विरोधकांनी भाजपवर जोरदार टीका देखील केली होती. पोस्टल मतदान असताना देखील आज गिरीश बापट यांनी मतदानाचा हक्क बजावला. अनेक दिवसांपासून बापट हे आजारी आहेत. आज मतदानासाठी येताना त्यांना व्हीलचेअरवर बसवून घेऊन जाण्यात आले. यावेळी त्यांच्या नाकाला ऑक्सिजनचे पाईप देखील लावलेले होते.