पुणे -मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे यांनी पुकारलेल्या आंदोलनाला पाठींबा आहे, आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारने विशेष अधिवेशन घ्यावे, असे मुद्दे मांडत खासदार उदयनराजे भोसले यांनी खासदार संभाजीराजे छत्रपती यांची भेट घेतल्यानंतर आपल्या शैलीत आरक्षणाच्या मुद्द्यावर मते मांडली. संभाजीराजे आणि उदयनराजे यांची सोमवारी (दि. 14 जून) पुण्यात भेट झाली. आरक्षणाच्या मुद्द्यावर दोघात चर्चा झाली. त्यानंतर पत्रकार परिषदेत दोघांनीही आपले मत मांडले.
तशी वेळ येऊ देऊ नका
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मोठा उद्रेक झाला तर कोणी थांबवू शकणार नाही, तशी वेळ येऊ देऊ नका, असे सांगत खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली.
दम असेल तर विशेष अधिवेशन बोलवा
संभाजीराजे यांनी मांडलेली भूमिका मला मान्य आहे. संभाजीराजे करत असलेल्या आंदोलनाला पाठींबा आहे, असे सांगत राज्य सरकारमध्ये दम असेल तर या मराठा आरक्षणावर विशेष अधिवेशन बोलवावे, असे उदयनराजे म्हणाले. सर्व जातींना एकत्र ठेवू शकत नसाल तर देशाची फाळणी व्हायला किती वेळ लागतो. कुठल्याही पक्षाचा काही संबंध नाही, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, असे उदयनराजे म्हणाले.