महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तब्बल दोन महिन्यानंतर राज्यातील चित्रनगरीत लवकरच ऐकू येणार 'लाईट्स कॅमेरा अॅक्शन'... - मेघराज राजेभोसले लेटेस्ट न्यूज

मराठी चित्रपट महामंडळाच्या माध्यमातून या क्षेत्रातील अडचणीत असलेल्या लोकांना मदत करण्याचे प्रयत्न होत आहेत. यासंदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही माहिती देण्यात आली असल्याचे चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी सांगितले.

movie film in maharashtra
कोल्हापूरच्या चित्रनगरीला येणार सुगीचे दिवस

By

Published : May 21, 2020, 7:24 PM IST

Updated : May 25, 2020, 8:12 PM IST

पुणे -कोरोना महामारीमुळे देशात २१ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर झाले आहे. त्यामुळे सारे काही ठप्प झाले आहे. या काळात लोकांच्या मनोरंजनाचे प्रमुख साधन असलेल चित्रपट, मालिका उद्योग ठप्प आहे. या उद्योगांवर आधारीत चित्रपटगृहे व इतर उद्योगही बंद आहेत. लॉकडाऊन काही अंशी शिथिल होताच राज्यातील चित्रनगरी असलेले मुंबई, पुणे आणि कोल्हापुरात चित्रपट, मालिकांच्या चित्रीकरणाला वेग येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे तब्बल २ महिन्यानंतर या सर्व चित्रनगरीत लवकरच लाईट. . कॅमेरा. . अॅक्शन. . असा आवाज ऐकू येणार आहे. या संदर्भात ईटीव्ही भारतने घेतलेला खास आढावा....

कोल्हापूरच्या चित्रनगरीला येणार सुगीचे दिवस

कोल्हापूरच्या चित्रनगरीला येणार सुगीचे दिवस

कोल्हापूरची चित्रनगरी तब्बल 78 एकरमध्ये विस्तारलेली आहे. सध्या कोरोना संसर्गामुळे देशभर सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये ही चित्रनगरी देखील बंद आहे. तब्बल दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ चित्रनगरी बंद आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच लॉकडाऊनमध्ये शिथीलता दिल्यानंतर कोल्हापूरच्या चित्रनगरीत चित्रीकरण सुरू होणार हे निश्चित झाले आहे.

सध्या कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मुंबई-पुणे रेड झोनमध्ये आहेत. मुंबई-पुण्यामध्ये बहुतांश सर्वच चित्रपट, मालिकांचे चित्रीकरण पार पडते. मात्र कोरोनामुळे हे सर्वच अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आले आहे. त्यामुळे चित्रपट आणि मालिकांच्या निर्मात्यांनी चित्रीकरण करण्यास कोल्हापूरच्या चित्रनगरीला पसंती दर्शवली आहे. शिवाय कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सुद्धा कोल्हापूरला चित्रपट निर्मितीचे केंद्र बनविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे कोल्हापुरात लवकरच लाईट कॅमेरा आणि अॅक्शन असा आवाज ऐकू येणार आहे.

यातच एक आनंदाची गोष्ट म्हणजे कोल्हापुरात सद्या दोन सेट चित्रीकरणासाठी पूर्णपणे तयार आहेत. त्या ठिकाणी चित्रीकरणही यापूर्वी झाले आहे. सध्या सरकारने दोन कोटी रुपयांचा निधी चित्रनगरीसाठी दिला आहे. हा सर्व निधी चित्रनगरीत तिसरा सेट उभा करण्यासाठी खर्च होणार आहे. तिसऱ्या सेटच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली असून लवकरच हे काम सुद्धा पूर्ण होणार आहे.

लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर चित्रनगरीतील तिसऱ्या टप्प्याच्या सेट उभारणीच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. त्यामुळे लवकरच चित्रनगरीत 'लाईट कॅमेरा अॅक्शन असा आवाज ऐकायला मिळणार आहे.

पुण्यातील चित्रपटगृह कधी चालू होणार याबाबत अनिश्चितता

पुण्यातील चित्रपटगृह कधी चालू होणार याबाबत अनिश्चितता; कर्मचारी हवालदिल, परिस्थिती बिकट

कोरोना महामारीमुळे देशात लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्यामुळे सारे काही ठप्प झाले आहे. लोकांच्या मनोरंजनाचे साधन असलेल्या चित्रपटगृहांमध्ये काम करणारा मोठा वर्गही यात भरडला गेला आहे. पुणे शहरात लॉकडाऊनला दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ झाला आहे आणि त्याआधी काही दिवसांपासून चित्रपटगृहे बंद करण्यात आली होती. लॉकडाऊन उघडल्यानंतरही चित्रपटगृहांसमोरील अडचणी लगेच संपणार नाही. समजा लॉकडाऊननंतर काही व्यवहार सुरूही झाले तरी सध्या कुठलेच प्रॉडक्शन हाऊस काम करत नसल्याने नवीन चित्रपट येणार कुठून? कोणी एखादा नवीन चित्रपट तयार केला तरी असा एखादा चित्रपट दाखवण्यासाठी कोण चित्रपटगृह उघडणार आणि लोकांच्या मनात धाकधूकही असणार. त्यामुळे ते चित्रपटगृहात येणार का हाही प्रश्न आहेच.

बॉलीवूडमध्ये अनेक प्रॉडक्शन हाऊस बंद आहेत. हॉलीवूडमध्येही 21 नोव्हेंबरपर्यत अपवाद वगळता नवीन चित्रपट येणार नसल्याचे बोलले जाते आहे. त्यामुळे आमच्यासमोर अनिश्चितता आहे. कोरोनामुळे अनेक नवीन नियम येत आहेत. त्याची अंमलबाजवणी करताना अनेक प्रश्न आमच्या समोर सध्या आहेत. त्यामुळे आम्ही हतबल झालो आहोत, पुढचे चार महिने तरी चित्रपटगृह सुरू होणार नाहीत आणि त्यानंतरही सर्व अधांतरी आहे, अशी प्रतिक्रिया पुण्यातील सिटी प्राईड सिनेमगृह चालक प्रकाश चाफळकर यांनी दिली आहे.

चित्रपटगृहांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रश्नही बिकट झाले आहेत. काही चित्रपटगृह मालक आपल्या कर्मचाऱ्यांना थोडीफार आर्थिक मदत करून सांभाळत आहेत. मात्र सर्वसाधारण परिस्थिती बिकट असल्याचे समोर येत आहे. आगामी काळामध्ये खास करून सिंगल स्क्रीन सिनेमागृहांची परिस्थिती बिकट होणार असल्याचे मत या क्षेत्रातील व्यक्तींचे आहे. पुणे शहरामध्ये पंचवीस मल्टिप्लेक्स आहेत. त्यात प्रत्येक मल्टीप्लेक्सला शंभर कर्मचारी तसेच पुणे शहरामध्ये 17 ते 18 सिंगल स्क्रीन थिएटर आहेत. त्यात प्रत्येकी दहा कर्मचारी काम करतात. एकंदरीत पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात साधारण तीन ते साडेतीन हजार कर्मचारी हे थिएटरवर अवलंबून आहे. मात्र, त्यांच्या समस्यांकडे कुणीही पाहायला तयार नसल्याचे हेमंत दाते यांनी सांगितले. या कर्मचाऱ्यांच्या समस्येकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. त्यांचे अतोनात हाल होत असल्याचे ते म्हणाले. या कर्मचाऱ्यांना तातडीने मदत झाली पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. एकंदरीतच आगामी काळ हा चित्रपटगृहांसाठी आणि त्यावर अवलंबून असलेल्या लोकांसाठी अत्यंत बिकट असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

दरम्यान, मराठी चित्रपट महामंडळाच्या माध्यमातून या क्षेत्रातील अडचणीत असलेल्या लोकांना मदत करण्याचे प्रयत्न होत आहेत. यासंदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनांही माहिती देण्यात आली असल्याचे चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी सांगितले आहे. चित्रपटगृह कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडेही महामंडळ लक्ष देत असून त्यांच्या मदतीसाठी प्रयत्न होत असल्याचे राजेभोसले यांनी सांगितले.

Last Updated : May 25, 2020, 8:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details