पुणे - 'आई मी खूप अभ्यास करीन. मोठी अधिकारी बनून तुझे स्वप्न नक्की पूर्ण करीन. आम्हाला सोडून नको जाऊ' अशी आर्त हाक आंबेगाव तालुक्यातील धामणी गावातील स्माशनभूमीत ज्ञानेश्वरीने साऱ्या गावासमोर मारली. तेव्हा सर्वांची मने हेलावली. ही हृदय हेलावून टाकणारी घटना सोमवारी धामणी येथील गवंडीमळा येथे घडली. सविता गवंडी (33) असे ज्ञानेश्वरी या विद्यार्थिनीच्या मृत आईचे नाव आहे.
आई! मी तुझे स्वप्न नक्की पूर्ण करेन.. अंत्यदर्शन घेऊन ज्ञानेश्वरीने दिला दहावीचा पेपर... मंगळवारी सकाळी दहावीचा पेपर आणि सोमवारी रात्री ज्ञानेश्वरीच्या आईने जगाचा निरोप घेतला. याही परिस्थितीला मोठ्या धैर्याने तोंड देत आईचे अंत्यदर्शन घेऊन ज्ञानेश्वरीने आईला दिलेले वचन पुर्ण करण्यासाठी दहावीचा पहिला पेपर दिला.
हेही वाचा...हॉकीची 'राणी' : ही आहे भारताची 'सुवर्णकन्या' राणी रामपाल
सोमवारी रात्री ज्ञानेश्वरी आईजवळ बसून दहावीच्या पेपरचा अभ्यास करत होती. रात्रीच्या वेळी आईचे अचानकपणे निधन झाल्याने तिला जबर धक्का बसला. मंगळवारी सकाळी ज्ञानेश्वरीने आईचे अंत्यदर्शन घेतले आणि अंत्यविधी झाल्यानंतर थेट परीक्षा केंद्रावर दहावीचा पेपर देण्यासाठी गेली. तिच्या डोळ्यांतील अश्रू थांबता थांबत नव्हते. यावेळी तिचे वडील, नातेवाईक, ग्रामस्थ, शिक्षकांनी तिला आधार देण्याचा प्रयत्न केला.
धामणी येथील गवंडी कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून वडील दादाभाऊ यांनी शेती व्यवसायातून दोघांचे शिक्षण केले. मात्र, दोन वर्षांपासून सविता या आजारी होत्या. त्यांच्यावर अनेक ठिकाणी उपचार करण्यात आले. अखेर त्यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे कुटुंबाची वाताहात झाली असून परिसरात शोककळा पसरली आहे. दादाभाऊ गवंडी यांना तुषार व ज्ञानेश्वरी अशी दोन मुले असुन तुषारने नुकतेच बारावीचे पेपर दिले आहेत.
हेही वाचा...महिला दिन विशेष : जाणून घ्या फुटबॉलची 'दुर्गा' ओयनुम बेंबीम देवी यांच्याविषयी...
लहान वयातच आईच्या जाण्याने ज्ञानेश्वरीवर संपुर्ण कुटुंबाची जबाबदारी पडली आहे. त्यातुन दहावीची परीक्षेचा डोंगर पार पाडण्याची जिद्द तिने मनात कायम ठेवुन आईला दिलेला शब्द ती प्रत्यक्षात पूर्ण करणार आहे. ज्ञानेश्वरीची जिद्द कायम आहे. मात्र, सध्या तिला गरज आहे ती दानशुरांच्या आधाराच्या हातांची.