पुणे -दहावीच्या पहिल्या पेपरच्या दिवशीच आईचा मृत्यू झाला. मात्र, अधिकारी बनण्याचे वचन दिल्यामुळे तिने आईचे अंत्यदर्शन घेऊन पेपर दिला. ज्ञानेश्वरी दादाभाऊ गवंडी असे या विद्यार्थीनीचे नाव असून सविता दादाभाऊ गवंडी (वय 33) असे ज्ञानेश्वरीच्या आईचे नाव आहे. 'आई मी खूप अभ्यास करीन आणि मोठी अधिकारी बनून तुझं स्वप्न नक्की पूर्ण करीन, नको ना सोडून जाऊ आम्हाला' अशी आर्त हाक ज्ञानेश्वरीने तिच्या आईला मारली, तेव्हा अंत्यविधीसाठी उपस्थित जन समुदायालाही अश्रूंचा बांध फुटला. ही हृदय हेलावून टाकणारी घटना धामणी येथील गवंडीमळा येथे घडली आहे.
ज्ञानेश्वरीची आई सविता या गेल्या 2 वर्षापासून आजाराशी झुंजत होत्या, ज्यामुळे लहान वयातच घरकामाची जबाबदारी ज्ञानेश्वरीवर येऊन पडली. सोमवारी रात्री ज्ञानेश्वरी आईजवळ बसून दहावीच्या पेपरचा अभ्यास करत होती. दरम्यान, रात्रीच्या वेळी आईचे अचानकपणे निधन झाल्याने तिला जबर धक्का बसला. मात्र, मंगळवारी सकाळी ज्ञानेश्वरीने आईचे अंत्यदर्शन घेतले आणि अंत्यविधीनंतर ती थेट परीक्षा केंद्रावर दहावीचा पेपर देण्यासाठी गेली. तिच्या डोळ्यांतील अश्रू थांबता थांबत नव्हते. यावेळी ज्ञानेश्वरीचे वडील, नातेवाईक, ग्रामस्थ, शिक्षकांनी तिला आधार देण्याचा प्रयत्न केला.