पुणे - गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेले श्री क्षेत्र मयुरेश्वर मंदिर उद्यापासून सर्व भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात येत आहे. पाडव्याच्या निमित्ताने सकाळी गुरव मंडळींची प्रक्षाळ पूजा झाल्यानंतर पहाटे पाच वाजता मंदिराचा मुख्य गाभारा दर्शनासाठी खुला होणार आहे. सामाजिक अंतर राखून व मास्क घालूनच भाविकांना दर्शन घ्यावे लागणार आहे. अष्टविनायकांपैकी मोरगाव, सिद्धटेक, थेऊर ही मंदिरं चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या आधिपत्याखाली आहेत. काल (दि.14) रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यातील सर्व मंदिरे खुली करण्यास परवानगी दिली. यानुसार अष्टविनायक तीर्थक्षेत्र मोरगाव, सिद्धटेक, थेऊर ही मंदिरे खुली करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती विश्वस्त विनोद पवार यांनी दिली.
मोरेश्वर मंदिर भाविकांसाठी खुले होणार... मात्र 'या' अटी कायम
गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेले श्री क्षेत्र मयुरेश्वर मंदिर उद्यापासून सर्व भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात येत आहे. पाडव्याच्या निमित्ताने सकाळी गुरव मंडळींची प्रक्षाळ पूजा झाल्यानंतर पहाटे पाच वाजता मंदिराचा मुख्य गाभारा दर्शनासाठी खुला होणार आहे.
उद्या पाडव्याच्या दिवशी गुरव मंडळींची प्रक्षाळ पूजा झाल्यानंतर पहाटे पाच वाजता मंदिर सुरू भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहे. मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांसाठी सामाजिक अंतर पाळणे व मास्क सक्तीचे असल्याचे विश्वस्त विनोद पवार यांनी सांगितले. सोशल डिस्टन्स पाळण्यासाठी मंदिर व परिसरात जागोजागी रिमार्क करण्यात आले आहेत. तसेच प्रत्येक भाविकांच्या हातावर सॅनिटायझर दिल्यानंतरच मुख्य प्रवेशद्वारातून आत सोडले जाणार आहे.
उद्या पाडव्यानिमित्त दुपारी 3 वाजता 'श्रीं'च्या मूर्तीला भरजडित हिरे, माणिक, मोती यांचे सुवर्णालंकार चढवण्यात येणार आहेत. दरवर्षी मोरगांव पंचक्रोशीतील ग्रामस्थ श्रींचा हा पोशाख पाहण्यासाठी आवर्जून गर्दी करतात. उद्यापासून मंदिर सुरू होणार असल्याने गणेश भक्तांकडून समाधान व्यक्त होत आहे. मात्र कोरोनामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शासनाच्या सुचनेनुसार लहान मुलं, गर्भवती महिला आणि वयोवृद्धांना मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला आहे.