पुणे -कॅम्प परिसरातील 'फॅशन स्ट्रीट'ला शुक्रवारी मध्यरात्री लागलेल्या आगीत 500पेक्षा जास्त दुकाने जळून खाक झाली आहेत. कॅम्प परिसरातील हा फॅशन स्ट्रीट पुणेकरांचे खरेदीसाठी आवडते ठिकाण आहे. शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास या मार्केटमध्ये अचानक आग लागली. या भागात मोठ्या प्रमाणात कपड्यांची दुकाने असल्याने आग मोठ्या प्रमाणात भडकली. एक-एक करत शेकडो दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी पोहचले. 16 बंबाच्या मदतीने 4 ते 5 तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
आगीचे नेमके कारण अस्पष्ट -
या मार्केटमध्ये अचानक आग कशी लागली यावर चर्चा सुरू आहे. या भागात मोठ्या प्रमाणात कपड्यांची दुकाने आहेत. मात्र, हॉटेल किंवा खाद्यपदार्थ बनवण्याची दुकने नाहीत त्यामुळे ज्वलनशील वस्तू असण्याची शक्यता कमी होती, असे काही व्यवसायिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे आग लागण्याचे नेमके स्पष्ट कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.