पुणे- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या मोहिमेंतर्गत पुणे जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण शोधून त्यांना वेळेत उपचार मिळवून देण्याच्या दृष्टीने घरोघरी सर्वेक्षणावर भर दिले जात आहे. यासाठी ग्रामपंचायत क्षेत्रासाठी १ हजार ९७७, तर नगरपालिका क्षेत्रासाठी १ हजार २०३ पथकांची स्थापना करण्यात आली आहे. ग्रामपंचायत क्षेत्रात ३ लाख ५१ हजार ५१३, तर नगरपालिका क्षेत्रात १ लाख २४ हजार ४३१ नागरिकांची तपासणी पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.
जिल्ह्यातील ४६ ग्रामपंचायत क्षेत्रासाठी १०६ झोनल व १ हजार ९७७ सेक्टर अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ८ सप्टेंबर ते १६ सप्टेंबर २०२० दरम्यान एकूण ३ लाख ५१ हजार ५१३ नागरिकांची तपासणी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यात एकूण तपासणी झालेल्या नागरिकांपैकी ४ हजार ७६७ संशयित रुग्ण असून ४ हजार ६०२ नागरिकांची फ्ल्यू क्लिनिकमध्ये तपासणी करण्यात आली आहे. यापैकी ६७४ नागरिक बाधित, तर ३ हजार ८०१ नागरिक निगेटिव्ह आढळले आहेत. पॉझिटिव्ह असणाऱ्यांपैकी ५७७ रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. १०६ रुग्ण गृह अलगीकरणामध्ये आहेत. निगेटिव्ह असणाऱ्यांपैकी २ हजार ५४२ नागरिक गृह अलगीकरणामध्ये आहेत.