पुणे - मान्सून अखेर महाराष्ट्रात दाखल झाला आहे. कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात मॉन्सूनने प्रगती केली आहे. संपूर्ण गोवा, कर्नाटकचा भाग व्यापणाऱ्या मान्सून हर्णे, सोलापूरपर्यंत पोहोचला असल्याचे पुणे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
निसर्ग चक्रीवादळामुळे थांबलेली मान्सूनची वाटचाल पुन्हा एकदा सुरू झाली असून गोवा, दक्षिण कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात आज मान्सूनचे आगमन झाले आहे. आगामी चार ते पाच दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात हा मान्सून पोहोचेल, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवला.
महाराष्ट्रातील मान्सूनच्या वाटचालीबद्दल माहिती देताना वेधशाळेचे हवामान विभागप्रमुख डॉ. अनुपम कश्यपी पुढील चार दिवसात म्हणजेच 14 जूनपर्यंत राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या खाडीत मान्सूनयोग्य स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कोकण आणि गोवा परिसरात पुढील पाच दिवस चांगला पाऊस होईल असा अंदाज, पुणे वेधशाळेचे हवामान विभागप्रमुख डॉ. अनुपम कश्यपी यांनी सांगितले.
पुणे जिल्ह्यात आजपासून हळूहळू पावसाचा जोर वाढेल. १२ जून ते १४ जूनच्या दरम्यान पुणे जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस होईल. तर जिल्ह्यातील घाटमाथ्यावरही पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अंदाज आहे.