पुणे - दक्षिण कोकण आणि कोल्हापूरमध्ये गुरुवारी मान्सून दाखल झाला आहे. याबाबतची माहिती पुणे वेधशाळेचे शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यप यांनी दिली आहे.
खुशखबर...! कोकणसह कोल्हापुरात मान्सून दाखल - पुणे
गेल्या काही दिवसांपूर्वी वायू वादळाने अरबी समुद्रात थैमान घातले होते. याच वादळाच्या प्रभावामुळे मान्सून लांबणीवर गेला होता. मात्र, आता मान्सून कोकणात दाखल झाला आहे.
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे शेतीच्या कामांनाही वेग आला होता. लवकरच मान्सून दाखल होणार, या आशेने शेतकऱ्यांनी शेतीची मशागत देखील करून ठेवली होती. मात्र, अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वायू चक्रीवादळाचा मान्सूनवर परिणाम झाला. त्यामुळे मान्सून लांबणीवर गेला होता. येत्या २१ तारखेपासून मान्सून दाखल होऊन महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. हवामान खात्याचा अंदाज खरा ठरलेला आहे.
शेतकरी पावसासाठी आभाळाकडे डोळे लावून बसला होता. मात्र, आता मान्सून दाखल झाल्याने शेतकऱ्यांची प्रतिक्षा संपलेली आहे. महाराष्ट्रात जोरदार पाऊस बरसणार आहे. त्यामुळे आता शेतीच्या कामालाही वेग येणार आहे.