पुणे : पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या नावे असणाऱ्या बनावट फेसबुक अकाऊंटवरून एका व्यक्तीला पैशांची मागणी झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी स्वतः पोलीस आयुक्तांनी ऑफिशियल फेसबुक पेजवर पोस्ट करत माहिती दिली. अशा बनावट खात्यांपासून नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन त्यांनी केले. मात्र, अवघ्या तासाभरातच त्यांनी ही पोस्ट डिलीट केली.
फेसबुक आणि इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांची आर्थिक फसवणूक झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यात आता पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या नावाचा वापर करूनही पैसे मागितले जात असल्याचे समोर आले. या प्रकरणी पोलीस आयुक्तांनी त्यांच्या अधिकृत फेसबुकवर एक पोस्ट केली. त्यात त्यांनी म्हटले आहे की, माझ्या नावाचे बनावट फेसबुक खाते असल्याचे समोर आले आहे. सोशल मीडियावर काही बनावट अकाऊंट आहेत. त्यातून आर्थिक फसवणूक होऊ शकते. संबंधित बनावट खात्याप्रकरणी त्या व्यक्तीवर कारवाई केली जाईल. मात्र, नागरिकांनी बनावट खात्यांपासून सावध राहा, असे त्यांनी म्हटले आहे.