पुणे- गाय कापली जाते ही समस्या नसून गायीला आपण माता मानतो अशी श्रद्धा असतानाही कोणी गाय पाळायला तयार नाहीत ही समस्या आहे. हिंदूच गायींचे ठेकेदार असून तेच गाय कापायला पाठवतात. आपण गोवंश वाचवला. आता त्यांच्या खाण्यापिण्याचे काय? 45 हजार गायी कापल्या जाण्यापासून वाचवण्यात आल्या आहेत. त्यांना ठेवण्यासाठी गाईला माता मानणाऱ्या या देशात आपल्या कुटूंबात कुणी गाय सांभाळू शकत नाही का? असा सवाल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी उपस्थित केला.
हिंदूच गायींचे ठेकेदार आहेत, तेच गाय कापायला पाठवतात - सरसंघचालक मोहन भागवत - पुणे
प्रत्येक घर गोपालक झाले पाहिजे. प्रत्येक घर गायीचे संरक्षक बनले पाहिजे. सर्व समाज जागा झाला तरच गायीची समस्या मुळापासून संपुष्टात येईल, असे मत भागवत यांनी मांडले.

शनिवारी पुण्यात आयोजित गो-विज्ञान संशोधन संस्थेच्या कार्यक्रमासाठी मोहन भागवत पुण्यात आले होते, त्यावेळी बोलत होते. त्यांनी गायीच्या महत्वाची पारंपरिक आणि वैज्ञानिक सांगड घातली, गायींना कत्तलीपासून आपण वाचवले. आता त्यांना जगवायचे कसे? असा प्रश्न आहे. पाश्चिमात्य जगतात गाय उपभोगाची वस्तू मानली जाते. भारतात आपण तिला गोमाता म्हणतो. कारण गाय निसर्गावर, मातीवर, मनुष्यावर आणि मनुष्याच्या स्वभावावर देखील परिणाम करते ,असे आम्ही मानतो. आम्ही केवळ दुधासाठी गाईचे पालन करत नाही. गाय, गोमूत्र आणि शेण यांच्यातून भोवतालच पावित्र्य राखले जाते. आमचे आचरण विज्ञाननिष्ठ असले पाहिजे. विज्ञाननिष्ठ विचार करतो म्हणूनच आम्हाला गाय विश्वामाता वाटते, असे ते यावेळी म्हणाले.
गोसंवर्धन, गोपालन कसे करायचे याचे उदाहरण आम्हाला उभे करायचे आहे. त्यासाठी सगळ्यांनी एकत्रीत तसेच सर्वंकष प्रयत्न करणं गरजेचे आहे. समाज गायीच्या बाबतीत जागृत झाला तर कोणीही गाय कापायला पाठवणार नाही. आज हिंदूच गाय कापायला पाठवतात, गायींचे ठेकेदार हिंदूच आहेत. त्यामुळे प्रत्येक घर गोपालक झाले पाहिजे. प्रत्येक घर गायीचे संरक्षक बनले पाहिजे. सर्व समाज जागा झाला तरच गायीची समस्या मुळापासून संपुष्टात येईल असे मत भागवत यांनी मांडले.