पुणे - शुंडाभूषण, मुकुट, कान व पुष्पवस्त्र परिधान केलेले दगडूशेठच्या गणपती बाप्पाचे विलोभनीय रुप, चाफा, झेंडू, गुलाबासारख्या फुलांनी सजलेला संपूर्ण गाभारा आणि मोग-याच्या सुवासिक फुलांनी दगडूशेठ गणपतीला अभिषेक करण्यात आला. वासंतिक उटी व मोगरा महोत्सवाच्या निमित्ताने ही सजावट करण्यात आली. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मंदिर बंद असल्याने भाविकांनी ऑनलाइन पद्धतीने दर्शन घेतले.
आकर्षक सजावट
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे गणपती मंदिरात वासंतिक उटी, मोगरा महोत्सव आयोजित करण्यात आला. सरपाले फ्लॉवर्सचे सुभाष सरपाले आणि सहकाऱ्यांनी ही पुष्परचना केली. यंदाच्या पुष्पसजावटीमध्ये २०० किलो मोगरा, ११०० चाफ्याची फुले, डच गुलाब, दवणा, टगर, गुलछडी, गावरान गुलाब, झेंडू, ग्रीन पासली आदी प्रकारची शेकडो फुले वापरण्यात आली. तसेच श्रीं च्या चांदीच्या मूर्तीस चंदन, कस्तुरी याच्या उटीचे लेपन करण्यात आले होते.