पुणे - बारामती तालुक्यातील माळेगाव येथील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रविराज तावरे यांच्यावर गोळीबार करणार्या आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अवघ्या पंधरा दिवसांत सदर प्रकरणाचा तपास करून मोक्का अंतर्गत कारवाई केल्याची ही बारामतीतील पहिलीच घटना आहे. तावरे यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.
काय आहे प्रकरण?
३१ मे रोजी सायंकाळी सातच्या सुमारास रविराज तावरे हे त्यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे यांच्यासोबत बारामती तालुक्यातील माळेगाव येथील संभाजीनगर येथे स्वत:च्या वाहनातून गेले. तेथे त्यांनी वडापाव घेतला, गाडीकडे येत परत असताना दुचाकीहून आलेल्या दोघानी त्यांच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी रविराज यांच्या छातीत घुसली होती. जखमी अवस्थेत त्यांना तात्काळ एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी पुणे जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे यांनी तक्रार दिली होती.
हेही वाचा -रिक्षांची तोडफोड करणाऱ्या आरोपींची पोलिसांनी काढली धिंड
सदर गोळीबार प्रकरण हे फिर्यादी रोहिणी तावरे यांनी केलेल्या विकास कामाचा रोष, त्यांच्या कार्यकर्त्यांना वेळोवेळी धमकावण्याचा प्रयत्न करून राजकीय व आर्थिक फायदा मिळवणे, तसेच रविराज तावरे यांना संपवून दहशत निर्माण करण्याच्या हेतूने कट रचून अल्पवयीन मुलामार्फत गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबार प्रकरणातील आरोपींवर या आधीच खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, असे संघटितपणे केलेले 9 गंभीर स्वरुपातील गुन्हे दाखल आहेत.