बारामती: आम्हाला दरमहा पाच हजार रुपये खंडणी दिली नाही तर हाॅटेल चालू देणार नाही, असे म्हणत टोळक्याने बारामतीत हाॅटेलची मोडतोड (Hotel wreckage in Baramati) करत तेथील लोकांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना बारामतीत घडली. शहर पोलिसांनी या प्रकरणी पाचजणांविरोधात प्राणघातक हल्ल्यासह खंडणी आणि अन्य कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. आदेश कुचेकर, तेजस बच्छाव (दोघे रा. साठेनगर, बारामती), साहिल शिकिलकर (रा. लहुजीनगर, बारामती), पप्पू चंदनशिवे (रा. पंचशीलनगर, बारामती) आणि यश जाधव (रा. जूना मोरगाव रोड, बारामती) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
फिर्याद दिली: याप्रकरणी रामवृजसिंग अजुहदी प्रसाद वर्मा (वय ३८,मूळ रा. उत्तरप्रदेश, सध्या रा. फलटण रोड, बारामती) यांनी फिर्याद दिली. फिर्यादी हे गेल्या दहा वर्षांपासून बारामतीत राहत आहेत. गेल्या तीन महिन्यांपूर्वी त्यांनी फलटण चौकात एक गाळा भाडोत्री घेत तेथे दुर्वाज या नावे हाॅटेल सुरु केले आहे. त्यांच्यासोबत नातेवाईक कालुवा राममुर्ती (वय २८) तेथे काम करतो. मंगळवारी (दि. ८) रोजी दुपारी साडे तीनच्या सुमारास त्यांच्या ओळखीचे असणारे हे पाचजण तेथे गेले. त्यातील आदेश कुचेकर हा महेंद्र कुठे गेला आहे, त्याला लय मस्ती आली काय. मी त्याला भेटायला बोलावले होते. तो आला नाही. आज किती तारीख आली, हप्ता कोण त्याचा बाप देणार का, मी आत्ताच एका बारच्या मालकाकडून हप्ता वसूल करून आलोय, असे म्हणाला.