पुणे - महाराष्ट्र विधानसभेच्या कसबा पेठ व चिंचवड पोटनिवडणूक केंद्रीय निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आली आहे. कसबाच्या भाजप आमदार मुक्ता टिळक यांचे कर्करोगाने निधन झाल्याने जागा रिक्त झाली आहे. तसेच चिंचवडमध्ये भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधान झाल्याने जागा रिक्त झाली होती. केंद्रीय निवडणूक आयोगाने या दोन जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर केली आहे. या निवडणुकीसाठी मतदान 27 फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे. तर, मतमोजणी २ मार्च रोजी होणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी भाजप व कॉंग्रेसचे उमेदवार रिंगणात आहेत. दरम्यान, या दोन्ही पोटनिवडणुकीसाठी मनसेने भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र, मनसे प्रचाराच्या रिंगणात उतरणार नसल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे.
कसबा मतदारसंघ - विधान परिषद निवडणुकांनंतर आता पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. कसबाच्या भाजप आमदार मुक्ता टिळक यांचे कर्करोगाने निधन झाल्याने पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. या पोटनिवडणूकीसाठी भाजपकडून हेमंत रासने तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर मैदानात आहेत. पुणे जिल्ह्यातील सर्वात जुन्या क्षेत्रांपैकी कसबा पेठ हा विधानसभा मतदारसंघ पुणे लोकसभा मतदारसंघातील आहे. हा मतदारसंघ कसबा म्हणूनही ओळखले जातो. या मतदारसंघाला 'हार्ट ऑफ पुणे सिटी' असेही संबोधले जाते. 1995 पासून या जागेवर भारतीय जनता पक्षाचा कब्जा आहे.
मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व : पुण्याचे विद्यमान खासदार गिरीश बापट यांनी कसबा पेठ मतदारसंघाचे 25 वर्षे प्रतिनिधित्व केले. त्यांनी 1995 ते 2019 पर्यंत भाजप आमदार म्हणून कसबा मतदारसंघात बाजी मारली आहे. विधानसभा निवडणूक 2019 मध्ये भाजपच्या मुक्ता टिळक विजयी झाल्या होत्या. कसबा मतदारसंघात 1990 ते 2019 पर्यंत या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत.