पुणे -मागील दीड महिन्यांपासून राज्यात बिन पैशाचा तमाशा सुरू आहे. त्या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी राज्यातील जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष आणि शहराध्यक्षांची बैठक आयोजित केल्याची प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली. तसेच उद्या सविस्तर माध्यमांशी संवाद साधणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शहरात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत दोन दिवसीय संवाद शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावेळी माध्यमांशी संवाद साधला. या शिबिराला आज (शुक्रवार) आणि उद्या (शनिवारी) राज्यातील जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. यावेळी पक्षाध्यक्ष राज ठाकरे पक्ष बांधणीसह इतर विषयांवर कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.
हेही वाचा -हिवाळी अधिवेशन : विधानसभेचे कामकाज सुरू; नियंत्रक व महालेखा शिक्षकांचा अहवाल पटलावर
अभिनय करता करता लागू 'डॉक्टरां'चे 'मास्तर' कधी झाले ते कळले नाही -
खूप मोठे कलावंत आपल्यातून गेलेत. त्यांचा एकूण अभिनयाचा प्रवास पाहिला तर अनेक चित्रपट, नाटकांची नावे घेता येतील. समोर कितीही मोठा कलावंत असला तरी श्रीराम लागू आपली छाप पाडून जायचे, अशी माणसे आता होणार नाहीत. अभिनय करता करताना ते डॉक्टरांचे मास्तर कधी झाले ते महाराष्ट्रालाही कळले नाही, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली.
हेही वाचा - डॉ. श्रीराम लागू यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, डॉक्टर लागू अनंतात विलीन
ते पुढे म्हणाले, त्यांनी चित्रपटात साकारलेल्या मास्तरांच्या भूमिका अजरामर झाल्या आहेत. खऱ्या अर्थाने हिंदी चित्रपटात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे खूप मोठे व्यक्तिमत्त्व आपल्यातून गेले. हिंदीत त्यांनी शंभरहून अधिक चित्रपट केले. नाटक, मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट या सगळ्या प्रवासात स्वतःचा ठसा उमटवून जाणे, ही साधी-सोपी गोष्ट नाही. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने डॉ. श्रीराम लागू यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.