पुणे :उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या बाबत मनसे नेते वसंत मोरे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. पावसाळी अधिवेशनानंतर अजित पवारच राज्याचे मुख्यमंत्री होतील, असा विश्वास मनसे नेते वसंत मोरे यांनी व्यक्त केला आहे. त्याचवेळी वसंत मोरे यांनी तुम्ही उपमुख्यमंत्री व्हा, महापालिका निवडणुका घ्या, अशी मागणी केली आहे.
महापालिका निवडणुका घ्या : राष्ट्रवादीच्या बंडानंतर राज्यात सत्ता हस्तांतरित झाली. विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. त्यामुळे अजित पवार इतके दिवस सातत्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्या, अशी मागणी केली होती. मात्र आता अजित पवारच सत्ताधारी पक्षात गेल्याने पवारांनी महापालिका निवडणुका घ्याव्यात. लोकांच्या, नगरसेवकांच्या समस्या सोडवाव्यात, अशी मागणी वसंत मोरे यांनी केली आहे.
आरक्षणाबाबत न्यायालयात खटला :महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत. भाजप वगळता सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीची मागणी करत आहेत. अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आरक्षणाबाबत न्यायालयात खटला सुरू आहे. त्यामुळे निवडणुका होत नसल्याचे बोलले जात आहे. पण न्यायालय दोन महिन्याच्या दोन तारखा का देते यावर आठ दिवसात सुनावणी करून निर्णय घ्यावा, असे मत वसंत मोरे यांनी व्यक्त केले आहे.