पुणे- शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील घोटाळा प्रकरणी बँकेचे संचालक आणि आमदार अनिल भोसले यांच्यासह गुन्हे शाखेने मंगळवारी रात्री चौघांना अटक केली. या प्रकरणी भोसले यांच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बँकेत ७१ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवण्यात आला असून गैरव्यवहाराची व्याप्ती अधिक वाढण्याची शक्यता आहे. अनिल भोसले हे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद सदस्य आहेत.
बँकेचे संचालक भोसले यांच्यासह एस. व्ही. जाधव, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तान्हाजी पडवळ, बँकेचे अधिकारी शैलेश भोसले यांना अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून या गुन्ह्याचा तपास करण्यात येत आहे. भोसले यांच्यासह अटक करण्यात आलेल्या चौघांनाही बुधवारी दुपारी शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात येणार आहे.