पुणे- राज्यातील अनेक किल्ले हे केंद्र सरकारच्या अखत्यारित येतात. या गडकिल्यावर राज्य सरकार किवा इतर संस्थांना काम करायचे असल्यास त्यासाठी केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागते. मात्र, केंद्र सरकर लवकर परवानगी देत नसल्याने गड किल्ल्यांची डागडुजी रखडली आहे, असा आरोप आमदार विनायक मेटे यांनी भाजपवर केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या किल्ले शिवनेरीवर आज शिव जन्मोत्सव साजरा होत आहे. यावेळी आमदार विनायक मेटे येथे आले होते. यावेळी राज्य सरकारने केंद्र सरकारला बोलून त्यांच्या अखत्यारितील गड किल्ले राज्य सरकारच्या अखत्यारित आणावे, अशी विनंती मेटे यांनी राज्या सरकारला केली. त्याचबरोबर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज शिवनेरी गडावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी येणार आहे. त्यांनी मुख्यमंत्री म्हाणून तर अभिवादन करावेच त्याचबरोबर शिवसेनेचे पक्ष प्रमुख म्हणून देखील अभिवादन करावे. सोबत आपल्या कार्यकर्त्यांना देखील तारखेनुसारच अभिवादन करायला लावावे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री अशा दोन भूमिका निभावत असताना त्यांनी महाराजांप्रती दुजाभाव ठेवू नये, अशी प्रतिक्रिया मेटे यांनी दिली.