बारामती (पुणे) -राज्यपालांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व अन्य सदस्यांनी भेटून १२ आमदारांची यादी दिली आहे. त्यांच्या नियुक्त्या लवकरात लवकर व्हाव्यात याबाबत अनेकदा विनंती केली आहे. मात्र सरकार आग्रही नाही असे म्हणणे आश्चर्याचे असल्याचे आमदार रोहित पवार यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले. राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या दीर्घकाळ रखडलेल्या नियुक्त्या तत्काळ करा, अशी विनंती काँग्रेस नेते शरद रणपिसे यांनी पुणे दौऱ्यावर आलेल्या राज्यपालांकडे केली. यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्य सरकारच याबाबत आग्रही नाही, तुम्ही का आग्रह धरता, असे रणपिसे यांना सुनावले. याबाबत आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
'...तर नियुक्त्या लवकर होतील'
आमदार पवार म्हणाले, की सरकार आग्रही नाही हे खरं आश्चर्याची गोष्ट आहे. आग्रह करणे हे जर अपेक्षित आहे. तर आपण खूप आग्रह करू शकतो. संविधानाने दिलेले राज्यपाल पद हे खूप मोठे आहे. संविधानाच्या चौकटीत एखादी गोष्ट असेल तर ती प्रलंबित राहू नये, याची जबाबदारी राज्यपाल कार्यालयाची आहे. याबाबत न्यायालयानेही रखडलेल्या १२ आमदारांच्या नियुक्त्या बाबत आपले म्हणणे मांडले आहे. त्यामुळे या नियुक्त्या लवकरात लवकर होतील, अशी अपेक्षा रोहित पवार यांनी यावेळी व्यक्त केली. स्वातंत्रदिनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलक शेतकऱ्यांनी संसदेच्या परिसरात येऊ नये, यासाठी संसदेच्या प्रवेशद्वारा समोर प्रथमच कंटेनरची भिंत उभी करण्यात आली होती. याबाबत आमदार रोहित पवार यांना विचारले असता ते म्हणाले, की महाराष्ट्रात कोणत्याही एखाद्या मुद्द्यावरून आंदोलन करण्यासाठी काही जण बारामतीत येऊन आंदोलन करत असतात. आपल्या आंदोलनाचा संदेश पवार साहेबांपर्यंत पोहोचेल व त्यावर योग्य ते निर्णय घेतील, असा विश्वास आंदोलकांना असतो. मात्र असे आंदोलन होत असताना पोलीस बळाचा व कंटेनरचा वापर कधीही केला गेला नाही.