पुणे : आमदार रवींद्र धंगेकर यांनी काल करमाळा येथील काँग्रेस पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त कली होती. अजित पवार यांच्यानंतर रवींद्र यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. या बाबत त्यांना विचारलं असता ते म्हणाले की काल मी करमाळा येथे काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला गेलो होते. त्यावेळी मी मुख्यमंत्री व्हायचे स्वप्न व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री होण्याची इच्छा प्रत्येकालाच असते. अजित पावारांनी जी इच्छा व्यक्त केली आहे, ती त्यांची इच्छा आहे. प्रत्येकालाच इच्छा असते माझ्यासारख्या कार्यकर्त्याला देखील इच्छा आहे. मी देखील मुख्यमंत्री व्हावे, पण मला माझी ताकद माहित आहे. इच्छा व्यक्त करण्यात काहीही गैर नाही असे देखील यावेळी धंगेकर म्हणाले.
विधानसभेत आमचे सरकार येणार :राज्याच्या राजकारणात महाविकास आघाडी टिकणार की नाही अशी चर्चा सुरू आहे. यावर धंगेकर म्हणाले की, आज देशाचे तसेच राज्याचे राजकारण पाहता आज राज्यात महाविकास आघाडी टिकली पाहिजे. पुढील काळात सर्व निवडणुका या महाविकास आघाडीने एकत्र लढावी अशी माझी इच्छा आहे. आम्ही एकत्र लढलो तर, येणाऱ्या महापालिका तसेच विधानसभेत आमचे सरकार येणार असल्याचे विश्वास यावेळी धंगेकर यांनी व्यक्त केलं आहे.