पुणे- इंद्रायणी नदी संवर्धन आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देत आयोजित केलेल्या ‘रिर्व्हर सायक्लोथॉन’ मध्ये रविवारी तब्बल ८ हजार ७९० सायकलपटूंनी सहभाग घेतला. सर्वाधिक सायकलपटू सहभागी होण्याचा विक्रम आज पिंपरी-चिंचवडसह परिसरातील नागरिकांनी नोंदवला आहे. दरम्यान, कार्यक्रमाच्या समारोपावेळी आमदार महेश लांडगे यांनी सर्वांना झुंबा डान्स करायला लावत स्वतः ही 'तुझको मिर्ची लगी तो मैं क्या करू' या गाण्यावर ठेका धरला. संगीतमय वातावरणामुळे कार्यकर्त्यांमध्ये आणि तेथील उपस्थितांमध्ये एकच जल्लोष होता.
शिवपूत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, सायकल मित्र, अविरत श्रमदान आणि महेशदादा स्पोर्टस फाउंडेशन यांच्या वतीने ‘रिर्व्हर सायक्लोथॉन-२०२१’ चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे, आमदार महेश लांडगे, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, स्थानिक नगरसेवक-नगरसेविका आणि पदाधिकारी उपस्थित होते. इंद्रायणी नदी संवर्धनासाठी सायक्लोथॉनचे आयोजन
‘रिर्व्हर सायक्लोथॉन’ अंतर्गत १० किमी आणि २५ किमी अशी रॅली घेण्यात आली. इंद्रायणी नदी संवर्धन आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देत आयोजित केलेल्या ‘रिर्व्हर सायक्लोथॉन’ मध्ये रविवारी तब्बल ८ हजार ७९० सायकलपटूंनी सहभाग घेतला.
लांडगे यांचा झुंबा डान्स चांगलाच भावाला...
समारोपावेळी आमदार महेश लांडगे यांनी मंचावर उपस्थित असलेल्या व्यक्तींना झुंबा डान्स करायला लावत स्वतः 'तुझ को मिर्ची लगी तो मैं क्या करू' या गाण्यावर ठेका धरला. झुंबा नृत्य हे तंदरुस्तीशी निगडित असल्याने लांडगे यांनी स्वतः झुंबा नृत्य करत इतरांना करायला लावून तंदरुस्तीविषयी जनजागृती केल्याचे बोलले जात आहे. यामुळे सायक्लोथॉनला वेगळाच रंग चढला होता. कार्यकर्त्यांमध्ये आणि उपस्थितांमध्ये एकच जल्लोष होता. जो तो आमदार लांडगे यांचा डान्स मोबाईलमध्ये कैद करण्याचा प्रयत्न करत होता. लांडगे यांचे अनेक चाहते असून तरुणाईमध्ये त्यांची मोठी क्रेझ आहे. त्यामुळे त्यांचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
शहीद संभाजी राळे यांना श्रद्धांजली…
देशाच्या रक्षणासाठी हुतात्मा झालेले जवान संभाजी ज्ञानेश्वर राळे यांच्या कुटुंबीयांनीही ‘रिर्व्हर सायक्लोथॉन’ला उपस्थिती दर्शवली. अरुणा ज्ञानेश्वर राळे (आई), ज्ञानेश्वर जयवंत राळे (वडील), अमृता नामदेव गारगोटे (बहीण) उपस्थित होते. तसेच, रॅलीत सहभागी सायकलस्वारांकडून संभाजी राळे, कर्नल टी. एस. धामी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच सायकलपटूंना मार्गदर्शनही केले. अविरत श्रमदान संस्थेच्या माध्यमातून हुतात्मा जवान संभाजी राळे यांच्या कुटुंबीयांना एक लाख रुपयाच्या मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.