रायगड - ऐन निवडणुकीच्या तोंडावर रायगडात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. कर्जतमधील विद्यमान आमदार सुरेश लाड यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. रक्तदाबाच्या त्रासामुळे लाड गेले 3 दिवस रुग्णालयात उपचार घेत होते. त्यामुळे राष्ट्रवादीला ऐन निवडणुकीत नवीन उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे.
हेही वाचा -विधानसभा निवडणूक 2019 : शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह व्यक्तव्य करणारा श्रीपाद छिंदम नगरमधून लढणार
दरम्यान, लाड शिवसेनेच्या वाटेवर आहेत. ते सेनेकडून निवडणूक लढवतील, अशी चर्चा गेले 2 दिवस सुरू होती. मात्र, सेनेकडून महेंद्र थोरवे यांना उमेदवारी मिळाल्याने ती शक्यता मावळली आहे. सोमवारी प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत लाड यांनी निवडणूक न लढवण्याची भूमिका जाहीर केली. खासदार सुनील तटकरे यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, लाड आपल्या निर्णयावर ठाम राहिले.
हेही वाचा -मंत्रिपद देणार तिकडूनच लढणार; अनिल गोटेंचा सेना प्रवेशाचाही संकेत
तर राष्ट्रवादीकडून नवीन उमेदवाराचा शोध सुरू झाला आहे. सेनेतील इच्छुक नाराजही राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत. तसेच दुसरीकडे ही जागा शेकापला दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, लाड यांच्या माघारीने राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलाच धक्का बसला आहे.