पुणे- खेड सभापतींच्या मारहाण नाट्यामागे मी जर असेल तर आढळरावांनी पत्रकारांना सांगण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांना सांगावे आणि माझी शक्य तेवढी उच्च पातळीवर चौकशी करावी. मात्र त्या चौकशीत काही निष्पन्न झाले नाही तर, आढळरावांनी तोंडाला काळे फासून खेड तालुक्यात यावे, असे प्रत्युत्तर आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांवर दिले.
लोकसभेची निवडणूक हरल्यापासून ते नैराश्यग्रस्त झालेले आहेत. राज्यात तीन पक्षांची आघाडी झाल्याने, आपल्याला शिरूर मधून पुन्हा तिकीट मिळणार नाही, हे त्यांना ठाऊक असल्याने, ते शिवसेनेने बाहेर जायचे निमित्त शोधत असून काही ना काही वाद निर्माण करून, शिवसेनेतून बाहेर पडून भाजपमध्ये जाण्यासाठी ते वातावरण निर्मिती करत असल्याचे आमदार मोहिते म्हणाले.
डोणजे येथे झालेल्या हल्ल्याचे सर्व चित्रीकरण सीसीटीव्हीमध्ये आलेले आहे. तरीही आढळराव तसं घडलं नाही, असे धादांत खोटे बोलत आहेत. त्यामध्ये पोलीस तपास करत असून, सत्य काय आहे ते लवकरच समाजापुढे येईल. भगवान पोखरकर यांच्या राजीनामा नाट्यामागे आम्ही नसून त्यांच्याच पक्षातले नाराज सदस्य आहेत. माझ्या पक्षाच्या सदस्यांच्या धमक्या येऊ लागल्याने, संरक्षणासाठी मी त्यांना माझ्या भावाच्या रिसॉर्टवर आणून ठेवले होते, एवढाच यातील माझा रोल आहे. दरम्यान शिवसेनेचे नेते अनिल देसाई यांचे माझ्याबरोबर बोलणे झाले होते आणि हा वाद बसून आपण सामंजस्याने मिटवू, असे ते मला म्हणाले होते. परंतु त्यांच्याबरोबर बैठक होण्याअगोदरच आढळरावांनी हा हल्ला घडवून आणला. कोयते, कुऱ्हाडी घेऊन त्या ठिकाणी लोक आले होते. त्यांनी गोळीबारही केला, असा आरोप मोहिते यांनी केला आहे.