पुणे - खेड(राजगुरूनगर) तहसीलदारांच्या बदलीवरून तालुक्यात आमदार विरुद्ध तहसीलदार असे समीकरण जुंपले आहे. ही लढाई आता विकोपाला जात असून तहसीलदार सुचित्रा आमले यांचे पती बाळासाहेब आमले यांच्यापासून जीवाला धोका असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते यांनी केला आहे. यासाठी त्यांनी पोलीस संरक्षणाचीदेखील मागणी केलीय. गुंड प्रवृत्तीच्या वातावरणात वावरणाऱ्या तहसीलदारांच्या पतीवर पोलिसांनी कारवाई करावी, असे ते म्हणाले. यााबाबत त्यांनी खेड पोलीस ठाण्याला समक्ष येऊन लेखी तक्रार दाखल केली आहे.
सुचित्रा आमले यांची खेडच्या तहसीलदारपदावर नियुक्ती झाल्यावर तालुक्यातील अनेक गावात अवैध कामं सुरू असल्याचा आरोप स्थानिक आमदार दिलीप मोहिते यांनी केला. जमिनीच्या नोंदी, दाखले, रेशनकार्ड आदींसाठी तलाठी, सर्कल अधिकारी यांच्या माध्यमातून नागरिकांची अडवणूक होत आहे, असे म्हणाले.