पुणे- कामाबाबत निर्णय घेताना तुम्हाला मुख्यमंत्र्यांशी बोलावे लागत नाही. तुम्हीच मुख्यमंत्री आहात, असे म्हणत आमदार चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना टोला लगावला.
तुम्हीच मुख्यमंत्री आहात, चंद्रकांत पाटलांचा उपमुख्यमंत्र्यांना टोला पुणे महापालिकेतर्फे उभारण्यात आलेल्या सरसंघचालक बाळासाहेब देवरस एव्हिएशन गॅलरीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार चंद्रकांत पाटील हे देखील उपस्थित होते.
पुढे आमदार पाटील म्हणाले, माजी नगरसेवक बाळासाहेब बोडके यांनी दोन शब्द बोलावे, असे मी म्हणालो. पण ते बहुदा अजित दादांना घाबरतात. मात्र, ते दिसतात फक्त रागीट पण, दादा तसे प्रेमळ आहेत, असा चिमटा काढत अजित पवारांच्या कामाचे कौतुकही केले. प्रत्येक जिल्ह्यात छोटे तरी विमानतळ असावे, प्रत्येक तालुक्यात एक परिपुर्ण हेलीपॅड असावा, अशी अपेक्षाही यावेळी आमदार चंद्राकांत पाटील यांनी व्यक्त केली.
यावर बोलताना अजित पवार म्हणाले, पंगत बसली असून वाढपी मीच आहे. त्यामुळे आमदार निधीत एक कोटीची वाढ करत ती 3 कोटी करण्यात आली आहे. जो पर्यंत मी मंत्रिमंडळात आहे, तोपर्यंत पुणे जिल्ह्याच्या विकासात मी कोणतेही राजकारण आणणार नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
पुण्यात आंतराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ असले पाहिजे. त्यासाठी बजेटमध्ये तरतूद कमी दिसत असली तरी मुख्यमंत्र्यांना विनंती करून निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात एक मेडिकल कॉलेज झाले पाहिजे, अशी राज्य सरकारची भूमिका आहे. त्यानुसार यावर्षी नंदुरबार, त्यानंतर अलिबागला मेडिकल कॉलेज होणार आहे. पुण्यातही हे काम झाले म्हणून समजा, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.
हेही वाचा -VIDEO : मिसळ खाणाऱ्या तरुणांवर तलवार हल्ला करणारे चौघे जेरबंद