पिंपरी चिंचवड:सरकारच्या अस्तित्वासाठी केवळ ग्राहकांचाच विचार करण्यात आला आहे. कांदा न खाल्ल्यास कोणी मरणार नाही. मात्र, फक्त शेतकऱ्यांचे नुकसान का? असा प्रश्न आमदार बच्चू कडू यांनी सरकारला विचारला आहे. कांद्यावर निर्यात शुल्क लावण्याची गरज नव्हती. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरची व्यवस्था सरकार आजच करुन ठेवतंय. सरकार एव्हढे नालायक कसे? कांद्याचे भाव वाढल्याने अटलबिहारी वाजपेयी यांचं सरकार कोसळलं होतं? त्यामुळे हे नामर्द सरकार असं करत असल्याचा आरोप आमदार कडू यांनी केला आहे. तसेच येणाऱ्या काळात सरकारचा निषेध करणार असल्याचं आमदार कडू यांनी म्हटलं आहे. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात 'दिव्यांगांच्या दारी' या अभियानाअंतर्गत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
कांदा न खाल्ल्यास कोणी मरणार नाही :चिंचवडमध्ये अपंग कल्याण विभागाने ‘दिव्यांगांच्या दारी’ या अभियानाचे आयोजन केले होते. त्यावेळी कडू यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सरकार मुर्खासारखे वागत आहे. केवळ सरकार, ग्राहकांचाच विचार करत आहे. सरकार शेतकऱ्यांचा विचार का करत नाही? मी एनडीएमध्ये असलो तरी, शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहिलेच पाहिजे. भाव वाढले तर तुम्ही हस्तक्षेप करता, मग भाव कमी झाल्यावर हस्तक्षेप का करत नाही? असा हल्लाबोल त्यांनी मोदी सरकारवर केला आहे. तसेच कांदा न खाल्ल्यास लोक मरणार आहेत का?, शेतकऱ्यांचे नुकसान तुम्ही का करता? कांद्यावर निर्यात शुल्क लावण्याची गरज नव्हती असं देखील कडू यांनी म्हटलं आहे.