पुणे- नऊ वर्षांपूर्वी पुण्यातून बेपत्ता झालेला युवक माओवादी झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संतोष वसंत शेलार उर्फ विश्वा, असे या तरुणाचे नाव आहे. छत्तीसगड येथील माओवादी संघटनेत तो सहभागी झाला आहे. पुण्यातील भवानी पेठेतील कासेवाडी भागात तो राहत होता.
संतोष शेलार २०१० साली नोव्हेंबर महिन्यामध्ये पुण्यातून बेपत्ता झाला होता. याप्रकरणी पुण्यातील खडक पोलिसांत बेपत्ता असल्याची तक्रार त्याचा भाऊ संदीप शेलार याने दिली होती. संतोष पेशाने चित्रकार होता. तो कबीर कला मंचच्या शीतल साठे आणि सचिन माळी या दोघांच्या संपर्कात होता. २०१० साली तो पुण्यातून मुंबई येथे चित्रकला स्पर्धेसाठी गेला होता. त्यानंतर तो आजतागायत घरी परतला नव्हता.