पुणे - महाराष्ट्र, केरळ आणि कर्नाटक राज्यांमध्ये सध्या पुराने हाहाकार माजवला आहे. या परिस्थितीला केवळ अतिवृष्टी जबाबदार नसून धरणातून पाणी सोडण्याचे चुकीचे नियोजन आणि नदीपात्रामध्ये होत असलेले अनधिकृत बांधकाम कारणीभूत असल्याचे मत ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केले आहे.
पश्चिम घाटातील धरणे पूर्ण भरल्यानंतर त्यातून एकाच वेळी पाणी सोडल्याने केरळमध्ये पूर आल्याचा आरोप गाडगीळ यांनी केला आहे. याबाबत रिव्हर रिसर्च सेंटर या अभ्यासकांच्या ग्रुपने तसेच तिथल्या स्थानिक पंचायतींनी सरकारला जुलैपासूनच धरणांतून पाणी सोडावे, अशी मागणी केली होती. मात्र तसे झाले नाही. धरण पूर्ण भरल्यानंतर एकाच वेळेस मोठ्या प्रमाणात पाणी सोडले गेले, असेही त्यांनी सांगितले.