पुणे :पोलिसांच्या माहितीनुसार कोंढवा पोलीस ठाण्याच्या एका प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून आरोपी नोकरीला होता. मागील दोन महिन्यापासून तो शाळेतील चार ते पाच विद्यार्थिनींना मोबाईलवरून मेसेज पाठवायचा त्यांच्याशी जवळीक साधून, त्यांचे चुंबन घेऊन त्यांना मिठी मारायचा. काही दिवसापूर्वी शाळेत विद्यार्थिनीच्या सुरक्षेसाठी गुड टच बॅड टच उपक्रम एका स्वयंसेवी संघटनेने राबवला होता .यामध्ये मुलींना चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श याबद्दल सांगण्यात आल्यानंतर, विनयभंग झालेल्या विद्यार्थिनींनी हा संपूर्ण प्रकार समोर आणला आहे.
पालकांमध्ये चिंतेचे वातावरण :हा प्रकार समोर येताच पोलिसांकडून शिक्षकाला अटक करून गुन्हा दाखल केला आहे. या संपूर्ण प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात कलम 354 तसेच पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. तर शाळेमध्ये विद्यादान करणारे शिक्षकच आपले शोषण करणारे निघाल्याने शाळकरी मुलांच्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात महानगरपालिकेच्या शाळेत जास्तीत जास्त गरीब कुटुंबातले विद्यार्थी शिकत असतात. त्यांच्या आई-वडिलांना कामावर जाऊन ते बिनधास्त आपल्या मुलांना शिक्षकांच्या हवाली करत असतात. परंतु अशा प्रकारे घटना घडल्याने पुण्यात मात्र चिंता व्यक्त केली जात आहे.