पुणे : राज्य सरकारच्या रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मंत्री गिरीश महाजन यांनी मोठे विधान केले आहे. येत्या आठवड्याभरात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे, असे ते म्हणाले. अमित शाह आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यामुळे विस्ताराला जास्त काळ लागणार नाही, लवकरच याबाबत निर्णय होणार असल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. दिवंगत आमदार विनायक निम्हण यांच्या जयंतीनिमित्त आयोजित आरोग्य शिबीरात ते आले होते.
अजित पवारांनी केले फिटनेसचे कौतुक :या आरोग्य शिबीरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गिरीश महाजन यांचा सर्वात फिट मंत्री म्हणून उल्लेख केला. यावर महाजन यांनी मिश्कील प्रतिक्रिया दिली. 'आज फ्रेंड्सशिप डे आहे. सुरुवातीपासून आमच्या दोघात खूप राजकीय विरोध होता. त्यांनी 20 वर्षात माझ्या मतदार संघात एक रुपयाही पारितोषक म्हणून दिले नाही. मात्र, आता ते आमच्याबरोबर आहेत आणि ते नेहमी भेटल्यावर माझ्या फिटनेसचे कौतुक करतात', असे गिरीश महाजन म्हणाले.
'औरंगजेबाचे उदात्तीकरण करणे चुकीचे' : यावेळी औरंगजेबाच्या मुद्द्यावरही गिरीश महाजन यांना विचारण्यात आले. 'आपल्याकडे लोकशाही असून प्रत्येकाला बोलण्याचे स्वातंत्र्य आहे. मात्र, याचा अर्थ असा नाही की ज्याला जे वाटेल त्याने ते बोलावे. भालचंद्र नेमाडे हे ज्येष्ठ साहित्यिक आहेत. पण ते ज्या पद्धतीने उदात्तीकरण करत आहेत ते चुकीचे आहे. ते हे सगळे प्रसिद्धीसाठी तर करत नाही ना?', असा सवाल गिरीश महाजन यांनी उपस्थित केला.