पुणे- शेतकऱ्यांवर अन्याय होत असताना अण्णा हजारे शांत राहतील, असे वाटत नाही. अण्णांच्या वयाचा विचार करता त्यांच्या तब्बेतीची काळजी वाटते, मात्र भाजप सत्तेच्या काळजीपोटी आणि आपल्यावर आफत येऊ नये, यासाठी अण्णांना उपोषणाला न बसण्याची विनंती करत आहे, असे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केले. ते पुण्यात बोलत होते.
शेतकरी आंदोलनात केंद्र सरकार हिटलरशाहीप्रमाणे वागत आहे, हे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. शेतकऱ्याचे आंदोलन हे भारताच्या इतिहासातले एक ऐतिहासिक आंदोलन आहे. मात्र, देशाचा प्रमुख त्यांच्याशी बोलतही नाही, देशाचा गृहमंत्री राज्याच्या निवडणुकांकडे लक्ष देतो, हे अत्यंत दुर्दैवी आहे. हे शेतकऱ्यांच्या भावना ओळखून घ्यायला तयार नाहीत, त्यांच्याशी चर्चा करायला तयार नाहीत, उलट हे आंदोलन चिरडून टाकण्याचे घृणास्पद काम हे सरकार करत आहे, त्याचा निषेध सर्वांनी केला पाहिजे, असे थोरात म्हणाले.