बारामती : मिमीक्री करणे हा राज ठाकरे यांचा जन्मसिद्ध हक्क आहे. स्वत:चा पक्ष वाढवण्यापेक्षा त्यांना अजित पवार ची मिमिक्री करणे, अजित पवार चे व्यंगचित्र काढणे यामध्ये जर समाधान वाटत असेल तर माझ्या राज ठाकरेंना शुभेच्छा आहेत, अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज ठाकरे यांची खिल्ली उडवली. बारामती येथे रविवारी (दि. ७) विकासकामांचा आढावा व नियोजित दौऱ्यानिमित्त विरोधी पक्षनेते अजित पवार आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा खरपुस समाचार घेतला.
राज ठाकरेंची उडवली खिल्ली :राज ठाकरे यांना मिमिक्री शिवाय दुसरे काय जमते. मिमिक्री करणे हा राज ठाकरे यांचा जन्मसिद्ध हक्क आहे. त्यांना जनतेने नाकारले आहे. शिवसेनेमधून बाहेर पडल्यानंतर त्यांचे १४ आमदार निवडून आले होते. नंतर एक आमदार निवडून आला. जुन्नरच्या महेशराव लांडगे यांनी मागच्या विधानसभेमध्ये त्यांच्याकडून तिकीट घेतले म्हणून मनसेचा एक आमदार त्यावेळी निवडून आला. त्यांना स्वत:चा पक्ष वाढवण्यापेक्षा अजित पवारांची मिमिक्री करणे, अजित पवारांचे व्यंगचित्र काढणे यामध्ये जर समाधान वाटत असेल तर माझ्या राज ठाकरेंना शुभेच्छा आहेत, असे पवार यावेळी म्हणाले.
पत्रकारांवर निशाणा :ज्यांना माझे काम बघवत नाही. त्यांच्या मनात नेहमी काहीतरी असते. ज्यांचे माज्यावर मनापासून प्रेम आहे. ते माझ्याबाबत जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करतात, अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विरोधक तसेच काही पत्रकारांवर निशाणा साधला. मुख्यमंत्री कुठे गेले आहेत याच्याशी मला काय करायचे आहे. तुम्ही जसे माझ्या वॉचवर असता, तसा मी मुख्यमंत्र्यांच्या वॉचवर नाही. अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकारांची फिरकी घेतली.