महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बारामती : एमआयडीसी बसस्थानक गेल्या दोन वर्षांपासून धूळघात - बारामती बस स्थानक बातमी

मागील दोन वर्षांपासून एमआयडीसी परिसरातील बसस्थानक धूळखात पडून आहे. याबाबत संबंधित अधिकार्‍यांकडे माहिती घेतली असता, ते ही याबाबत अनभिज्ञ असल्याचे समोर आले आहे.

midc-bus-stand-not-started-since-last-two-year-in-baramati
बारामती : एमआयडीसी बसस्थानक गेल्या दोन वर्षांपासून धूळघात

By

Published : Jan 7, 2021, 5:01 PM IST

बारामती -एमआयडीसी परिसरात तब्बल ५० लाख रुपये खर्चून नव्याने उभारलेले बस स्थानक मागील दोन वर्षांपासून धूळखात पडून आहे. या भागातील वाढत्या नागरीकरणाचा विचार करून हे बस स्थानक उभारण्यात आले आहे. मात्र, ते अद्याप कोणत्या कारणाने बंद आहे, याचे कोडे अद्याप कळू शकलेले नाही.

डेपोतून सोडल्या जातात गाड्या -

एमआयडीसी येथे उभारण्यात आलेल्या या बसस्थानकात रिझर्वेशन केंद्र, कॅन्टीन, स्वच्छतागृहे, पाण्याची सोय, प्रवाशांना बसण्यासाठी प्रतीक्षालय, आठ प्लॅटफॉर्मचे बस स्थानक, कंट्रोल कॅबिन, चालक व वाहकांंसाठी विश्रांती कक्ष, महिलांसाठी विश्रांती कक्ष, पार्सल सुविधा आधी सोयी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. मात्र, प्रवासी मागील दोन वर्षांपासून या सुविधांपासून वंचित आहेत. विशेष बाब म्हणजे येथून सुटणाऱ्या लांब पल्ल्याचा ४४ गाड्या बस स्थानकातून न सुटता मागे असलेल्या डेपोतून सोडल्या जात आहेत.

अडचण नसून खोळंबा -

बारामती शहराचा वाढता विस्तार पाहता बारामती एमआयडीसी परिसरातही मोठ्या प्रमाणात नागरीकरण वाढले आहे. या भागातील नागरिकांना गावोगावी प्रवास करण्यासाठी पाच किलोमीटरचे अंतर पार करून बारामतीत यावे लागत होते. याचा विचार करून येथील प्रवाशांच्या सोयीसाठी एमआयडीसी परिसरात तब्बल ५० लाख रुपये खर्च करून बस स्थानकाची उभारणी करण्यात आली. मात्र, हे बसस्थानक बांधून सज्ज असले तरी, अद्याप सुरू होत नसल्याने अडचण नसून खोळंबा, अशी परिस्थिती येथील प्रवाशांची झाल्याचे दिसून येत आहे.

अधिकारी ही अनभिज्ञ -

हे बस स्थानक केव्हा सुरू होणार याबाबत संबंधित अधिकार्‍यांकडे माहिती घेतली असता, ते ही याबाबत अनभिज्ञ असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हे बसस्थानक सुरू होणार की नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली असून बसस्थानक सुरू न होण्यामागची कारणे अद्यापही गुलदस्त्यात असल्याचे दिसते.

हेही वाचा- दिल्लीत शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली, २६ जानेवारीसाठी रंगीत तालीम

ABOUT THE AUTHOR

...view details