पुणे -राज्यात काही ठिकाणी पूर्व मान्सून पावसाच्या सरी कोसळत आहेत. पुढील चार दिवस पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्टात विजांच्या कडकडाटासह पावसचीही शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागप्रमुख अनुपम कश्यपी यांनी सांगितले.
अनुपम कश्यपी, भारतीय हवामान विभागप्रमुख मराठवाडा आणि विदर्भात पावसाच्या हलक्या सरी कोसळतील असेही ते म्हणाले. मध्य प्रदेश राज्यात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने दाबाचे वारे कर्नाटकच्या दिशेने वाहतायेत आणि याच कारणामुळे पुढील चार दिवस राज्यात पावसाची शक्यता आहे.
राज्यात काही ठिकाणी पाऊस होत असताना अत्यावश्यक सेवा किंवा काही प्रमाणातील सवलतींमुळे घराबाहेर पडाव्या लागणाऱ्या पुणेकरांना सध्या उन्हाच्या चटक्यांचा सामना करावा लागतो आहे. पुणे शहर आणि परिसरातील तापमानाचा पारा सलग आठवडाभर ४० अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदविला जात आहे. रात्रीच्या तापमानातील वाढीमुळेही कमालीचा उकाडा जाणवतो आहे.
मे महिन्याच्या सुरुवातीपासून शहरातील तापमान ३८ ते ३९ अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदविले जात होते. मात्र, ५ मे नंतर तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसपुढे गेला. त्यानंतर तापमानाचा पारा कमी-अधिक होत असला, तरी तो अद्यापही ४० अंशांच्या खाली आलेला नाही.