पुणे : राज्यात दोन दिवसापूर्वीच पावसाला सुरूवात झाली आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राज्याच्या कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले की, जरी पावसाला सुरवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये. असे राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी सांगितले आहे.
राज्यात आतापर्यंत 25 टक्के पाऊस : याबाबत सुनील चव्हाण म्हणाले की, यंदाच्या वर्षी 21 जून पर्यंत पावसाचे प्रमाण हे खूपच कमी होते. पण या चार दिवसात 36 एमएम इतका पाऊस पडला आहे. जून महिन्याच्या सरासरी पावसाचा अंदाज बघितला तर दरवर्षी जून महिन्यात 207 एमएम पाऊस पडतो. पण यंदा आतापर्यंत 53 एमएम पाऊस पडला आहे. म्हणजेच आतापर्यंत यंदा सरासरीच्या 25 टक्के पाऊस पडला आहे. राज्यात आतापर्यंत 2 लाख 47 हजार हेक्टरवर पेरणी देखील झाली आहे. पण शेतकऱ्यांनी घाई न करता जो पर्यंत 100 एमएमच्या पुढे पाऊस पडत नाही, तसेच जोपर्यंत जमीन पुर्णत ओली होत नाही, तोपर्यंत पेरणी करू नये असे आवाहन, कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.