पुणे: विमानतळावर चेकिंगसाठी उशीर होत असल्याने एका महिलेने आपल्याकडे बॉम्ब असल्याची अफवा पसरवली. यामुळे विमानतळावरील प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणेचे धावपळ झाली. मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला दिल्लीला जात होती. चेकिंगसाठी उशीर होत होता. आपली चेकिंग लवकर व्हावी, यासाठी तिने आपल्याकडे बॉम्ब असल्याची खोटी बतावणी केली होती.
गुन्हा दाखल: याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतले असून तिची चौकशी केली जात आहे. निती प्रकाश कपलानी (वय 72) असे महिलेचे नाव असून तिच्याविरुद्धात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही महिला गुरग्राममधील उदयोग विहार,इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स धुंडाहेरा येथील रहिवाशी आहे. महिलेने दिलेल्या माहितीची सत्यता तपासली जात आहे आणि त्यांच्या कृतीमागील हेतू समजून घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगतिले. दरम्यान पुण्यात 2 दहशतवाद्यांना पकडल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. नागरिकांमध्ये मात्र दहशतीचे वातावरण आहे. अशात या महिलेने आपल्याकडे बॉम्ब असल्याची खोटी माहिती विमानतळावरील चेकिंग करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला दिली. यामुळे विमानतळावर भीतीचे वातावरण पसरले होते. याबाबत अधिक माहिती अशी की, काल दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास पुणे एअरपोर्टवर फिस्कींग बुथमध्ये अधिकारी व सहकारी हे कर्तव्यावर होते. त्यावेळी आरोपी महिला निती प्रकाश कपलानी ही महिला चेकिंग पाईंटवर आली. ''मेरे चारों तरफ बम लगा है" असे तिने विमानतळावरील पोलिसांना सांगितले. यानंतर विमानतळावरील प्रशासनाची धावपळ उडाली.