महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उघडले देवाचे द्वार.. हजारो भाविकांनी घेतले मयुरेश्वराचे दर्शन - Mayureshwar temple news

अष्टविनायकापैकी एक असणाऱ्या मयुरेश्वर मंदिर आज भाविकांसाठी खुले करण्यात आले. सकाळपासून हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.

मयुरेश्वर मंदिर
मयुरेश्वर मंदिर

By

Published : Nov 16, 2020, 8:04 PM IST

बारामती (पुणे) - अष्टविनायक मंदिरांपैकी पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात असणाऱ्या मोरगाव स्थित मयुरेश्वर मंदिर आज (दि. 17 नोव्हेंबर) भाविकांसाठी खुले करण्यात आले. दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिर खुले झाल्याने भाविकांंमधून आनंद व्यक्त केला जात असून सकाळपासून हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील आठ महिने टाळेबंदीच्या काळात या मयुरेश्वर मंदिरातसह राज्यभरातील मंदिरे बंद होती. मात्र आज दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यभरातील मंदिरे खुले करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने मयुरेश्वराचे मंदिर उघडण्यात आले आहे. अष्टविनायकांपैकी प्रथम स्थान असणाऱ्या मयुरेश्वराचे मंदिर खुले झाले असल्याने गणेश भक्तांकडून आनंद व्यक्त केला जात आहे.

आज (सोमवार) पहाटे पाच वाजल्यापासून भाविकांसाठी मंदिर करण्यात आले. आजच्या दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर शहाजीराजे व आदिल शहा यांच्या काळातील सुमारे साडेचारशे वर्षापूर्वीचे अलंकारिक पोशाखात श्रींची मुर्ती सजवण्यात आली. पुणे, मुंबई, ठाणे, सातारा, कोल्हापूर, सांगलीसह पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी नियमांचे पालन करून दर्शन घेतले, अशी माहिती मयुरेश्वर मंदिराचे विश्वस्त विनोद पवार यांनी दिली.

नियमांचे पालन करून घेतले दर्शन

राज्य शासनाच्या काही नियम व अटी नुसार मंदिरे खुली करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मयुरेश्वर मंदिर व्यवस्थापकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करून भाविकांसाठी श्रींच्या दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी मंदिरात येणाऱ्या भाविकांना मास्कचा वापर करणे, सॅनिटायझरचा वापर करणे, सामाजिक अंतर राखणे आदी सुचना मंदिर व्यवस्थापनाकडून देण्यात येत होत्या. भाविकांनीही नियमांचे पालन करून दर्शन घेतले.

यांना प्रवेश नाकारला

राज्य शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार साठ वर्षांवरील वयोवृद्ध व दहा वर्षांखालील बालकांना तसेच गरोदर स्त्रीयांना मंदिराच्या प्रवेशद्वारातूनच श्रींचे दर्शन घ्यावे लागले.

भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली आठ महिन्यांपासून धार्मिकस्थळे बंद करण्यात आली होती. मंदिरे उघडावीत यासाठी विविध राजकीय पक्ष, संघटनांंनी मागणी व आंदोलने केली होती. राज्य सरकारने शेवटी काही नियम व अटी घालून आज दिवाळीच्या पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यातील सर्वच मंदिर खुले करण्याचा निर्णय घेतल्याने भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details