पिंपरी-चिंचवड (पुणे) - सध्या नवरात्रीचा उत्सव सुरू असून शहरातील मावा जिलेबी खवय्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. ही जिलेबी उपवासाठी विशेष बनवली जाते तसेच इतर व्यक्ती देखील खाऊ शकतात. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील प्रभात जलपान गृह दुकानावर जिलेबी प्रेमींची गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र, याचे दर साधारण जिलेबीपेक्षाही जास्त असतात. शनिवारपासून (दि. 17 ऑक्टोबर) नवरात्रौत्सव सुरू झाल्याने जिलेबीची मागणी वाढली आहे.
मध्यप्रदेश आणि मुंबईमध्ये भेटणारी मावा जिलेबी आता पुण्यात म्हणजे पिंपरी-चिंचवड शहरात मिळणार असल्याने खाद्य प्रेमी खुश आहेत. एरवी साधी जिलेबी खाऊन कंटाळलेल्या ग्राहकांना मावा जिलेबी खुश करते आहे. अवघ्या देशात नवरात्रौत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साध्या पध्दतीने साजरा केला जात आहे. कोरोनामुळे बाहेरचे खाद्यपदार्थ खाणे देखील अनेक जण टाळत आहेत. परंतु, उपवासाची मावा जिलेबी खाण्यासाठी नागरिक उत्सुक असल्याचे दिसत आहे.