पुणे -कोरोनाचे संकट हळूहळू कमी होत असताना राज्यातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. इतके दिवस बंद असलेले सर्वच उद्योगधंदे सुरू करण्यासाठी राज्य शासनाने परवानगी दिली आहे. परंतु, लग्नकार्यासाठी लागणारे मंगल कार्यालय, लॉन्समध्ये फक्त ५० नागरिकांच्या उपस्थितीतच लग्न करण्याची परवानगी आहे. त्यामुळे, आता इतर सर्व गोष्टींना परवानगी दिल्यानंतर लग्नासाठी ५० व्यक्तींची मर्यादा का ? असा प्रश्न मंगल कार्यालयांच्या मालकांनी उपस्थित केला आहे.
७०० हून अधिक मंगल कार्यालये रिकामी
पुण्यात मंगल कार्यालय आणि लॉन्स असोसिएशन यांच्या अंतर्गत जवळपास ७५० मंगल कार्यालय आणि लॉन आहेत. यांचा सर्वाधिक वापर लग्नसमारंभासाठी होतो. सरकारने केवळ ५० नागरिकांच्या उपस्थितीतच लग्न पार पाडावे, अशी अट घालून दिलेली आहे. त्यामुळे, फक्त ५० नागरिकांसाठी मंगल कार्यालय भाड्याने का घ्यावे? असा प्रश्न नागरिकांच्या मनात पडतो? म्हणून मंगल कार्यालये आणि लॉन्स रिकामे पडले आहेत.
लग्नकार्यावर अवलंबून असणाऱ्यांचा रोजगाराचा प्रश्न
मंगल कार्यालय बुकिंग, सजावट, बँड, डीजे, सनई वाला, फेटेवाला, घोडेवाला यांचेही लग्नसोहोळ्यात महत्वाचे स्थान आहे. परंतु, मागील काही दिवसांपासून मंगल कार्यालये सुनी पडल्यामुळे सदर व्यावसायिकांचा रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.