पुणे - महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी लिहिता वाचता येणे अपेक्षित आहे. अलीकडच्या काळात इंग्रजी माध्यमातून शिकण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, या इंग्रजी माध्यमातून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मराठी बोलण्यास अडथळे येऊ लागले आहेत. ही बाब महाराष्ट्रासाठी नक्कीच भूषणावह नाही. त्यामुळे राज्यातील सर्वच शाळांमध्ये १ ली ते १० वी पर्यंत मराठी विषय हा सक्तीचा करणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच बारामतीत आले. यावेळी अजित पवारांचे ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले. बारामती तालुका व शहर यांच्या वतीने अजित पवारांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. त्यानंतर अजित पवार बोलत होते. बारामतीकरांच्या विकासासाठी मी सदैव कटीबद्ध असल्याचेही पवार यावेळी म्हणाले.
पोलिसांसाठी ऐतिहासीक निर्णय घेणार
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देशातील पोलीस खात्यासाठी एक ऐतिहासिक निर्णय घेतला होता. पोलिसांची हाफ पॅन्ट बदलून फुल पॅन्ट करण्याचा ऐतिहासिक निर्णय त्यांनी घेतला होता. तसाच ऐतिहासिक निर्णय घेऊन महाराष्ट्रातील पोलीस कर्मचाऱ्यांना 180 स्क्वेअर फुटाचे घर आहे, त्यात बदल करून ५०० स्क्वेअर फुटाचे सुसज्ज घर बांधून देणार असल्याचे पवार म्हणाले.
भेदभाव न करता निधी देणार
उपमुख्यमंत्री झाल्याने आणखी माझी जबाबदारी वाढली आहे. विकासाच्या बाबतीत कोणताही भेदभाव न करता निधी देण्याचे काम करणार असल्याचे अजित पवार म्हणाले. काही केलं तरी मनुष्य स्वभाव आहे, त्यामुळे बारामतीकरांच्या विकासासाठी जास्त निधी देणार असल्याचे पवार म्हणाले. बारामतीकरांच्या उपकारांची या जन्मातही फेड होणार नाही. त्यांच्या विकासासाठी, त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी संपूर्ण ताकदीने प्रयत्न करणार असल्याचे पवार म्हणाले.