पुणे : एकेकाळी मराठी हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या अभिनेत्याचा भाड्याच्या घरात मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. रवींद्र हनुमंत महाजनी असे त्या भाड्याच्या घरात मृतदेह आढळलेल्या अभिनेत्याचे नाव आहे. रवींद्र महाजनी यांचा मृतदेह मावळ येथील आंबी गावातील एका बंद खोलीत मृतदेह आढळून आला. रवींद्र महाजनी यांच्या भाड्याच्या खोलीतून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर शेजाऱ्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिल्यानंतर ही घटना उघडकीस आली.
बंद घरात आढळला मृतदेह :रविंद्र महाजनी हे मावळमधील आंबी येथे गेल्या अनेक दिवसांपासून भाड्याच्या खोलीत राहत होते. मात्र त्यांच्या बंद घरातून दुर्गंधी येत असल्याने त्यांच्या शेजाऱ्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपासणी केली. यावेळी रविंद्र महाजनी यांचा मृतदेह त्यांच्या बंद खोलीत आढळून आला. रविंद्र महाजनी हे 77 वर्षाचे होते. त्यांनी अनेक मराठी हिंदी चित्रपटात अभिनय केला आहे.
कपडे बदलताना झाला असावा मृत्यू :रवींद्र महाजनी हे गेल्या 9 महिन्यापासून मावळ तालुक्यातील आंबी गावात एक्झर्बिया सोसायटीमध्ये राहत होते. त्यांच्यावर काही दिवसापूर्वी शस्त्रक्रिया झाली होती. त्यामुळे त्यांना जास्त हिंडता फिरता येत नव्हते. अंघोळ केल्यानंतर कपडे बदलताना त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी व्यक्त केली आहे. तळेगाव पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेतला आहे. पुढील तपास तळेगाव एमआयडीसी पोलीस करत आहेत.
टॅक्सी चालक ते सुप्रसिद्ध अभिनेते :रवींद्र महाजनी यांचा जन्म बेळगाव येथे झाला. त्यांचे वडील ह रा महाजनी हे सुप्रसिद्ध पत्रकार होते. मात्र बेळगाववरुन ते मुंबईत दाखल झाल्याने रवींद्र महाजनी यांचे बालपण मुंबईत गेले. रवींद्र महाजनी यांना अभिनयाची आवड असल्याने त्यांनी स्नेहसंमेलनात अनेक भूमिका केला. रवींद्र महाजनी यांनी चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी तब्बल तीन वर्ष मंबईत टॅक्सी चालक म्हणून काम केले आहे. मात्र त्यांच्यातील कलाकाराने त्यांना स्वस्थ बसू दिले नाही. त्यामुळे त्यांनी रात्री टॅक्सी चालवून दिवसा आपल्यातील कलाकाराला चालना दिली. रोज वेगवेगळ्या दिग्दर्शकाला भेटून ते कुठे काम मिळते का याचा शोध घेत होते. अखेर त्यांची 'झुंज' यशस्वी झाली, त्यांना मराठी चित्रपटसृष्टीत मधुसूदन कालेलकर यांनी 'जाणता अजाणता' या नाटकात काम मिळाले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. त्यानंतर 'झुंज' चित्रपटाने त्यांना मराठी चित्रपटसृष्टीत नवी ओळख दिली.
उधळ गुलाल या आगामी चित्रपटात साकारणार होते भूमिका :रवींद्र महाजनी यांचे मावळमधील आंबी गावात निधन झाल्याने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. रवींद्र महाजनी हे त्यांच्या आगामी उधळ गुलाल या महत्वाकांक्षी चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणार होते. त्याची तयारी रवींद्र महाजनी यांनी सुरू केली होती. उधळ गुलाल हा चित्रपट दिग्दर्शक वैभव बाबाजी हे दिग्दर्शीत करत आहेत. या चित्रपटातील महत्वाच्या भूमिकेत रवींद्र महाजनी काम करणार होते. ही भूमिकाही त्यांना आवडली होती. मात्र रवींद्र महाजनी यांच्यावर काळाने घाला घातल्याने त्यांचा हा आगामी चित्रपट अपूर्ण राहिला.
खेळ कुणाला दैवाचा कळला :रवींद्र महाजनी यांनी अनेक चित्रपटात अजरामर भूमिका केल्या आहेत. रवींद्र महाजनी यांनी टॅक्सी चालक ते अभिनेता असा भारावून टाकणारा जीवन प्रवास त्यांनी केला आहे. त्यांनी आपल्या चित्रपटसृष्टीतील सुरुवात 'झुंज' या चित्रपटाने केली. त्यानंतर देवता या चित्रपटातील भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. त्यानंतर मुंबईचा फौजदार, लक्ष्मी, गोंधळात गोंधळ, हळदी कुंकू अशा अनेक चित्रपटात त्यांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. रवींद्र महाजनी यांनी पानिपत या चित्रपटातही महत्वाची भूमिका निभावली आहे. विशेष म्हणजे गश्मीर महाजनी आणि रवींद्र महाजनी या दोन्ही पिता पुत्रांनी या चित्रपटात एकत्र भूमिका साकारली आहे.