पुणे : Maratha Reservation Protest: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या 16 दिवसांपासून उपोषण सुरु केलं आहे. त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज पुणे बंद न ठेवता मराठा क्रांती मोर्चा पुण्यात लाक्षणिक उपोषण ( Maratha Kranti Morcha ) करण्यात येणार आहे. तर शहरातील औंध, बाणेर, बालेवाडी बंद राहणार असल्याची माहिती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
मराठा क्रांती मोर्चाची पत्रकार परिषद :मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं पुण्यात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मराठा आरक्षणाबाबत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं भूमिका मांडण्यात आली. यावेळी मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कुंजीर, तुषार काकडे, प्रशांत धुमाळ, बाळासाहेब आमराळे, अमर पवार, सचिन आडेकर, युवराज दिसले, गुलाबराव गायकवाड, श्रुतिका पाडळे आदीं उपस्थित होते.
मागण्या मान्य करुन गुन्हे मागं घ्या :मराठा आरक्षणसाठी आंदोलनं करणाऱ्या कार्यकर्त्यांविरुद्ध दाखल करण्यात आलेले गुन्हे तातडीनं मागं घेऊन रद्दबातल करावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. जालना येथील अंतरवाली सराटी इंथं मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी केलेल्या मागण्या राज्य सरकारनं तातडीनं मान्य कराव्यात, अशी मागणी यावेळी मराठा क्रांती मोर्चानं पत्रकार परिषदेत केली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या व्हिडिओचा केला निषेध :मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरु केलं आहे. त्यांनी राज्य सरकारकडं मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्यावं, आंदोलकवरील गुन्हे तातडीनं मागं घ्यावेत आदी मागण्या केल्या आहेत. त्याचा शासनानं गंभीरपणानं विचार करून निर्णय घ्यावा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चानं या पत्रकार परिषदेत केली. शासनानं नेमलेल्या समितीचा अहवाल सकारात्मक आणि इतर कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही, याचा विचार करून सादर करावा. या अहवालाविषयी मराठा समाजातील अभ्यासकांना विश्वासात घ्यावं, या आंदोलनात आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराची चौकशी करून तातडीनं दोषी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, त्याचा निषेध देखील या पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आला.
हेही वाचा :
- Maratha Kranti Morcha: नांदेडात मराठा आंदोलक आक्रमक; संतप्त आंदोलकांनी मालेगाव-नांदेड रस्त्यावर पेटवली बस
- Maratha Reservation Protest : मराठा समाज आक्रमक; संतप्त तरुणानं केला आत्मदहनाचा प्रयत्न