पुणे Maratha Protest:मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे. मात्र, मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार अजूनही ठोस भूमिका घेत नसल्यानं त्याचे तीव्र पडसाद राज्याच्या अनेक भागात उमटताना दिसत आहेत. दरम्यान, पुण्यातील डीपी रोडवरील शुभारंभ लॉन्स येथे महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ, तसंच वंचित विकास संस्थेच्या वतीनं ‘आपली दिवाळी स्वदेशी दिवाळी’ या उपक्रमाचं आयोजन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. मात्र, या कार्यक्रमाला उदय सामंत आले नाहीत.
सरकारच्या विरोधात घोषणाबाजी :कार्यक्रमाच्या ठिकाणी मराठा समाजाच्या आंदोलकांनी राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत कार्यक्रम रोखण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमाच्या बाहेर लावलेलं उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत यांचं फ्लेक्सही आंदोलकांनी फाडलं. त्यामुळं काही काळ परिसरात तणाव निर्माण झाला होता.
पुणे मार्केट यार्ड बंद : मराठा आंदोलक राज्यात आक्रमक झाले असून काही ठिकाणी हिंसाचाऱ्याच्या घटना घडल्या आहेत. तसंच आंदोलकांनी लोकप्रतिनिधींना लक्ष्य केल्यानं राजकारण चांगलंच तापलं आहे. दरम्यान, पुण्यातील छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड येथील कामगार संघटनेनं एक दिवस बाजार बंद ठेवण्याचं आवाहन केलं आहे. यावेळी कामगार संघटनेचे अध्यक्ष संतोष नागरे म्हणाले, "मराठ्यांना आरक्षण मिळायलाच हवं. मनोज जरांगे पाटील हे गेल्या 8 दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. त्याला पाठिंबा देण्यासाठी आम्ही बैठक घेतली असून बाजार एक दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला."या मार्केटची रोजची उलाढाल 15 ते 20 कोटी रुपये आहे", असं संतोष नागरे यांनी सांगितलंय.