पुणेMaratha Morcha Baramati : जालन्यामध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केल्यानंतर अवघ्या महाराष्ट्रातील मराठा समाज आक्रमक झालाय. महाराष्ट्रात ठिकठिकाणी बंदची हाक देण्यात आलीय. आज बारामतीत देखील कडकडीत बंद पाळण्यात आलाय. 'सरकारचा भरलाय घडा, अजित पवार सरकारच्या बाहेर पडा' अशा घोषणांनी बारामती दणाणून सोडलीय. मराठा बांधवांकडून आज बारामती बंदची हाक देण्यात आली होती. मोठा मोर्चा देखील आज काढण्यात आला होता. यावेळी या रॅलीत अनेक मराठा बांधवांनी अजित पवारांच्या संबंधी अशा घोषणा दिल्या आहेत.
अजित पवारांचे दौरे रद्द :जालन्यात मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांवर लाठीमार केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठलाय. त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रात राजकारण्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बंदची हाक देण्यात आलीय. बारामतीमध्ये देखील मराठा बांधव आक्रमक झाल्याचे बघायला मिळत आहे. एकीकडं मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांवर झालेल्या लाठीमारानंतर अजित पवार यांनी काढता पाय घेतल्याचं दिसतंय. बुलडाणा आणि पिंपरी-चिंचवडमध्ये असलेला दौरा ऐनवेळी त्यांनी तब्येतीचं कारण देऊन रद्द केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बुलडाण्यातील जाहीर सभेत अजित पवारांनी दौरा का रद्द केला, हे सांगावं लागलं. आता दुसरीकडे आमचं सरकार हे फेविकॉलचा जोड सरकार असल्याचं ते सांगत आहेत. आम्ही एकत्र असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. तसं असलं तरी आता थेट बारामतीमधूनच अजित पवार यांना नागरिकांनी भावनिक (Baramati Maratha protesters) आवाहन केलंय.