पुणे : Manoj Jarange Patil Sabha :आमरण उपोषण करून मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला जेरीस आणलेले मनोज जरांगे पाटील आता थेट मैदानात उतरले आहेत. राज्य सरकारला आरक्षणासाठी महिनाभराचा अवधी देऊनही राज्य सरकारकडून ठोस निर्णय होत नसल्यानं मराठा बांधव आक्रमक झाले आहेत. दुसरीकडं जालन्यातील सुनिल कावळे या तरुणांने मराठा आरक्षणाकरिता मुंबईत आत्महत्या केली आहे.
कुणबी प्रमाणपत्राशिवाय मागे हटणार नाही : मराठा समाजातील (Maratha Reservation) एका बांधवाने गुरुवारी आत्महत्या केली होती. मराठा समाजावर दु:खाचा डोंगर कोसळलाय. मराठा समाज सुनिल कावळेंचे (Sunil Kawale Suicide) बलिदान वाया जाऊ देणार नाही. त्यांच्या कुटुबियांची मराठा समाज काळजी घेणार आहे. कुणबी प्रमाणपत्राशिवाय मागे हटणार नाही, असा हुंकार मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय. आतापर्यंत झालेल्या मराठा समाजाच्या आत्महत्यांना सरकार जबाबदार असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलाय.
शांततेत आरक्षण मिळवणार : आरक्षणाच्या मागणीसाठी मराठ्यांचे आंदोलन शांततेत सुरू आहे. ठोकल्याशिवाय मागण्या पूर्ण होत नाहीत, अशी एकेकाळी मराठा समाजाची भावना होती, पण, आता शांततेत आरक्षण मिळवणार असा शब्द आहे. मराठा आरक्षण मिळवल्याशिवाय समाज एक इंचही मागे हटणार नाही, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. मी मराठा समाजाच्या शब्दापुढे जात नाही. मराठा समाज माझा मायबाप आहे. मायबापाच्या शब्दापुढे मी जात नाही. आपल्या वाट्याला कष्ट आले. परंतु, लेकरांच्या वाट्याला हे कष्ट नको. मराठा आरक्षण मिळवण्यासाठी राज्यातला मराठा एक झाला आहे. मराठ्यांना आरक्षण द्यायचं म्हटलं की पुरावे लागतात. टिकणारे आरक्षण देण्यासाठी सरकारने एक महिन्यांचा वेळ मागितला. सरकारला आपण चाळीस दिवसांचा वेळ दिला. आपण मुदत दिल्यानंतर हालचालीनंतर वेग आला आहे, असे मनोज जरांगे म्हणाले.